सातारा : पाच लाख घेवून तो पळत होता.. लोकं बघत होती | पुढारी

सातारा : पाच लाख घेवून तो पळत होता.. लोकं बघत होती

सातारा : विठ्ठल हेंद्रे : शहराचे नाक असलेले पोवई नाका ठिकाण.. सकाळी 11 वाजताची वेळ.. दुचाकीच्या डिकीमध्ये दीड लाखाची रोकड.. चौघे येतात अन् गाडी का धडकवली? असे म्हणत वाद घालतात.. याचवेळी चोरटे डिकीतील कॅश चोरुन पळू लागतात.. ‘चोर.. चोर.. पैसे.. पैसे..वाचवा.. वाचवा..’ असा आर्त धावा. 1 किलोमीटर पोवई नाक्यावर जीवाचा आकांत सुरु होता. दुर्देवाने लोकं फक्‍त बघ्याचे काम करत होती.

त्याचे असे झाले, सातार्‍यात बँकेत भरणा करायला निघालेल्या कर्मचार्‍याला लुटण्यासाठी अगोदरच प्लॅनिंग झाले होते. सहा जणांच्या टोळीने प्रत्येकाचा रोल निश्‍चित केला होता. त्यासाठी दोन दुचाकींचा वापर झाला आहे. पैसे चोरण्यासाठी दोघांनी जायचे. दोघांना या मोहिमेत अडथळा आल्यानंतर इतर दोघांनी जावून मोहिम फत्ते करायची असा बी प्लॅन झाला होता. घटनेदिवशी पहिल्या दोघांना पैसे चोरण्याची मोहिम फत्ते झाली नाही. त्यांना अडथळा आल्यानंतर इतर दोघांनी धाव घेतली.

चोरट्यांनी पैसे चोरल्यानंतर चोरट्यांनी तक्रारदार यांच्या दुचाकीची चावी स्वत:कडे ठेवली. कारण त्यामुळे तक्रारदार याला पाठलाग करता येवू नये, हा त्यामागील उद्देश होता. प्लॅनिंगनुसार तसेच झाले चोरट्यांनी पैसे घेतल्यानंतर चावी घेवून पळ काढला. तक्रारदार मात्र घाबरलेल्या स्थितीमध्ये चोरट्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

पोवई नाक्यापासून पाठलाग करण्यास सुरुवात झाल्यानंतर कराड अर्बन बँक परिसर तेथून सिव्हील रोडने चोरटे पळत गेले. पाठ शिवणीचा खेळ पुढे सेंट पॉल स्कूलच्या पुढील व पाठीमागील गेट व एका लॅबपर्यंत थरारक पाठलाग झाला. ही सर्व पळापळ सुमारे दीड किलोमीटर अंतराची झाली. प्रत्येक ठिकाणी तक्रारदार चोर..चोर पकडा, थांबवा असे ओरडत होते.

मात्र लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, पोलिस तपास करत असताना पळापळ झालेल्या दीड किलोमीटर अंतरावर केवळ एका ठिकाणीच खासगी व्यक्‍तीचे सीसीटीव्ही मिळाले. इतर ठिकाणी सीसीटीव्ही होते. मात्र त्याची क्‍वालिटी सुमार असल्याने त्याचा पोलिसांना काही फायदा झाला नाही.

हाफ मर्डरमधून सुटले दरोड्यात अडकले…

एलसीबीने दरोड्यात अटक केलेल्या दोघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचे समोर आले. शुभम साठे व गौरव भिसे यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आहे. 4 फेब्रुवारी रोजी त्यांचा जामीन झालेला आहे. हाफ मर्डरमध्ये असतानाच दरोड्याचा गुन्हा केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button