

नगर : अहिल्यानगरमध्ये एमआयडीसी विस्तारीकरणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र आता नॅशनल डिफेन्स कॉरिडोरमध्ये अहिल्यानगरचा समावेश केल्याने येथील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी युतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, विक्रमसिंह पाचपुते, तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, नगराध्यक्ष सत्यजित कदम, ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जयदीप कवाडे, रवी अनासपुरे, विजय चौधरी, अभय आगरकर, सीए राजेंद्र काळे, गणेश भोसले, भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मी येण्याची गजर नव्हती. कारण मी येण्याआधीच तुम्ही पाच नगरसेवक बिनविरोध निवडून दिले. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार आहे.
70 वर्षे गावांकडे लक्ष दिले; पण शहराकडे दुर्लक्ष झाले. रोजगाराच्या शोधात लोक शहराकडे आले. त्यामुळे शहरांची लोकसंख्या वाढली. परिणामी झोपडपट्ट्या वाढल्या, अतिक्रमणे झाली. पाणीपुरवठा, कचरा, नाले, दुर्गंधी, रोगराई अशा सगळ्या समस्या राज्यभर शहरांत पाहायला मिळाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावांबरोबर शहर विकासाचा संकल्प केला. शहरासाठी अमृत योजना, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास शहरी योजना राबविल्या आहेत. शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची जागा हक्काची होणार आहे. त्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे. लवकरच जागेचे मोजमाप करून त्यांच्या मालकी हक्क पट्ट्या द्या. त्याचे पीआर कार्ड द्यायचे, जेणे करून त्यांना पक्के घर बांधता येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे द्यायची आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंधी, पंजाबी समाज निवार्सित म्हणून विविध शहरांमध्ये वास्तव्य करीत आहे. त्यांना ज्या ठिकाणी जागा दिली, त्या जागा त्यांच्या मालकीच्या झाल्या नाहीत. आपण निर्वासित फ्री होल्डच्या जागा देण्याचा निर्णय घेतला असून, अनेक शहरांत जागा दिल्या आहेत. येणाऱ्या काळात नगरमध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. पूर्वी कचऱ्याचे मोठे संकट होते. मात्र आता कचरा संपत्ती आहे. कचऱ्यापासून खत, कोळशाच्या प्लेट तयार करतो. त्या प्लेट वीजनिर्मातीसाठी वापरता येतात. कचऱ्यापासून विद्युत निर्मिती व गॅस निर्मिती सुरू केली आहे. कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रियेकरिता अहिल्यानगर महापालिकेला मदत करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. विरोधक मात्र पुन्हा अहिल्यानगरचे नाव बदलण्याची वल्गना करीत आहेत. परंतु, जोपर्यंत आमचा श्वास सुरू आहे. तोपर्यंत कोणीही शहराचे पुन्हा नाव बदलू शकत नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले ही विकासाची नांदी आहे.
492 कोटींच्या सुधारित पाणी योजनेला मान्यता देणार
शहरात अमृत योजनेतून 164 कोटींची भुयारी गटार योजना सुरू आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत 150 कोटींच्या 24 रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील 13 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्वी महापालिकेला 50 कोटीसुद्धा मिळत नव्हते. आता भाजप-राष्ट्रवादी युतीचा महापौर झाल्यानंतर एका महिन्यात महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेल्या 492 कोटींच्या सुधारित पाणी योजनेला मान्यता देण्यात येईल. अहिल्यानगरला प्रत्येकी दिवशी पाणी आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
सिस्पे अन् इतरांची सीबीआय चौकशी करणार
काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून चैन करत पैसे गोळा केले आणि कंपनी ढप केली. त्या माध्यमातून गरिबांना लुबाडले. त्यांना आम्ही सोडणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येईल. ज्या लोकांनी पैसा खाल्ला, त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.
डीपी रस्त्यासाठी 350 कोटी
शहरातील डीपी रस्त्यांसाठी 350 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. शहराला व जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन थांबणार नाही. अहिल्यादेवी यांनी राजधानी माहेश्वर हे सुसज्ज शहर बनविले होते. त्याप्रमाणे अहिल्यानगर बनविण्याचा मानस आहे. डीपी रोड, क्रीडा संकुल पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्र्यांनी नगर दत्तक घ्यावे : विखे
तत्पूर्वी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ही महाविजयी संकल्पाची सभा आहे. मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तरीही एमआयडीसी विस्तारीकरणाचा प्रश्न बाकी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगर दत्तक घ्यावे. सिस्पे, ग्रो मोअर कंपन्यांच्या माध्यमातून हजारो गरिबांची फसवणूक झाली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असून संबंधित नेते केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले आहेत. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.