

करंजी : उपोषण व आंदोलनानंतर तालुका प्रशासनाने अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करत ज्या ठिकाणी पोलिसांनी गोमांस पकडले ती सात ठिकाणे बुधवारी (दि. 7) रात्री आठच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी सांगितले.
राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून तिसगाव येथे मात्र कायदा पायदळी तुडवत अनधिकृतपणे कत्तलखाने सुरू होते. पोलिस प्रशासनानेही अनेक वेळा या कत्तलखान्यांवर कारवाई केली, तरीही कत्तलखाने बंद होत नव्हते. त्यामुळे हिंदू समाज बांधवांतर्फे मोठा संताप व्यक्त केला जात होता.
बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयासमोर तालुक्यातील अनेक संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण, रास्ता रोको आंदोलन झाले. जोपर्यंत तिसगाव येथील अवैध कत्तलखाने प्रशासनाकडून सील करण्यात येत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका संत-महंतांसह बजरंग दल, तसेच हिंदू समाज बांधवांकडून घेण्यात आली.
तरुणांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत तिसगाव येथील अवैध कत्तलखाने सील करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता अतिरिक्त पोलिस अधीक्षक कलबुर्गी, प्रांताधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलिस अधिकारी राजगुरू, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी संगीता पालवे, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह अहिल्यानगर येथून आलेल्या दोन शीघ्र कृती दल पोलिस तुकड्या तिसगाव येथे दाखल झाल्या.
ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गोमांस पकडले ती ठिकाणे व संपूर्ण भाग परिसर प्रशासनाने रात्री आठच्या सुमारास अखेर सील केला आहे. प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तिसगाव येथे कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही. मुळात पाथर्डीवरून निघतानाच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी ठोस कारवाईच्या भूमिकेतूनच तिसगावकडे मार्गस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी सायंकाळी सातच्या सुमारास तिसगावमध्ये येऊन ही ठोस कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तिसगाव येथे थांबून होत्या.