

नगर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर महापालिकेने स्वीप समितीच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी 8 ते 14 जानेवारी दरम्यान सिटी वोट फेस्टिवल या मतदार जनजागृती सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व स्पर्धांसाठी मतदार जनजागृती हा विषय असून 8 जानेवारीला भाषण स्पर्धा, 9 जानेवारीला आई-वडिलांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणारी शपथ व संकल्पपत्र, 10 जानेवारीला संक्रांती मतदार जनजागृतीपर ग्रीटिंग बनवा स्पर्धा,
11 जानेवारीला पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपला ऑनलाइन मतदार जनजागृती संदेश/इमेजेस/व्हिडिओचे वितरण, 12 जानेवारीला महिला माता पालक मतदार जनजागृतीचा हळदी कुंकू मेळावा, 13 जानेवारीला शालेय परिसरातून प्रभात फेरी /शोभायात्रा/ मतदार रॅली, 14 जानेवारीला ऑनलाइन मतदार जनजागृती बल्क व्हाट्सअप संदेशाचे वितरण आदी विविध स्पर्धां-उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे मतदान संकल्पपत्र, भेटकार्ड, लेखन साहित्य 17 जानेवारीपर्यंत महापालिकेच्या प्रशासकीय इमारततीत पाठवावी. सहभागी शाळा व कृतिशील शिक्षकांना सन्मानपत्र व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, मतदारदूत डॉ.अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.