

कोळपेवाडी : कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन ‘कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा’, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात 2 हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले.
रब्बीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत उपलब्ध होत नाही, त्याबाबत आ. काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्रव्यवहार करून कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना केल्या होत्या. परंतु तरीही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे आ.काळे यांनी गुरुवार (दि.8) रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यात चांगलीच झाडाझडती घेवून त्यांना चांगलेच खडसावले. मला कारणे नको, युरिया किती देणार याचा आकडा सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एक महिन्यात 2 हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही आ. काळे यांना दिली.
या बैठकीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिल्हा कृषी निरीक्षक राहुल ढगे, कृषी अधिकारी गणेश बिरदवडे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, स्पिक-ग्रीनस्टार कंपनीचे प्रतिनिधी गोविंद मुंढे, आर.सी.एफ.चे प्रतिनिधी धनाजीराव देशमुख, इफकोचे प्रतिनिधी वैभव ढेपे, संकेत कराळे, एन.बी.सी.एल.चे संदीप अहिरे, पी.पी.एल.चे सिद्धांत दत्ता, संकेत भोज उपस्थित होते.
युरिया घेताना युरिया विक्रेते शेतकऱ्यांना लिंकिंग अर्थात युरिया सोबत इतर पुरवणी कृषी औषधांची खरेदी करण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे शेतकरी अजूनच अडचणी सापडला आहे. शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीची दखल घेऊन आ. काळे यांनी बैठक घेऊन युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच खडे बोल सुनावले. कोपरगाव तालुक्याला आवश्यक असलेला युरिया कोठा का पूर्ण केला जात नाही? अशी विचारणा करून युरिया खात्यासोबत इतर कृषी औषधांची व खतांची खरेदी करण्याचा आग्रह कमी करा. कृषी सेवा केंद्र चालक व वितरकांना जास्त लिंकिंगचा आग्रह धरू नका जेणेकरून त्यांचे मार्फत शेतकऱ्यांना लिंकिंग न करता युरिया पुरवठा करणे सोयीचे होईल अशा कडक सूचना आ. काळे यांनी दिल्या.
मागील वर्षीचा कोपरगाव तालुक्याचा युरियाचा कोठा युरिया सप्लायर कंपन्यांनी पूर्ण न केल्यामुळे ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई जाणवत आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे बदललेली पीक पद्धती व मका क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे युरियाची टंचाई अधिकच जाणवू लागली आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व सर्व कृषी सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजावून घेतले. ते प्रश्न व अडचणी कृषी विभागाच्या बैठकीत उपस्थित करून संबंधित खत सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्या अडचणीवर तोडगा काढून ते प्रश्न व अडचणी तातडीने सोडवण्याच्या सूचना आ. काळे यांनी संबंधित खत सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या.