

पाथर्डी : बनावट नोटा तयार करणे व बाळगणे, व्यापाऱ्यांची फसवणूक तसेच इतर अनेक गंभीर गुन्ह्यांत तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले.
बनावट नोटा प्रकरणातील फरार आरोपी अंकुश वसंत आघाव (वय 35, रा. पिरेवाडी, ता. पाथर्डी) हा आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत दि. 6 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास मिळाली.
या माहितीच्या आधारे निरीक्षक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पिरेवाडी येथे सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी त्याचा तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि अखेर आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या. त्यास पाथर्डी पोलिस ठाण्यात आणले.
तपासादरम्यान आरोपी अंकुश आघाव याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाणे व इतर ठाण्यांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये मारहाण, अपहरण, धमकी, फसवणूक तसेच बनावट नोटा तयार करणे व वापरणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ पोलिस ठाण्यात दाखल बनावट नोटा प्रकरणातही तो आरोपी आहे. त्या गुन्ह्यात त्याचा एक साथीदार यापूर्वीच अटकेत आहे. या प्रकरणात पाथर्डी न्यायालयाने आरोपीविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. मात्र तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता.
पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, महेश रुईकर, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद व सागर बुधवंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला एका पोलिस कर्मचाऱ्याचा छुपा आश्रय होता, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे. आरोपीला आतून मदत करणारा तो पोलिस कर्मचारी कोण, याचा सखोल तपास करावा. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कसून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, अशी मागणी होत आहे.