

नेवासा : प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहिन. मात्र, जनतेच्या प्रश्नांमध्ये हलगर्जीपणा, कुचराई किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. दोषी आढळल्यास त्वरित कारवाई होईल, असा इशारा आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आढावा बैठकीत दिला.
बैठकीत महसूल, कृषी, पोलिस, आरोग्य व इतर सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आमदार लंघे यांनी जनतेच्या नाळेशी जोडलेले प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यामध्ये पांदण रस्त्यांचे प्रश्न, दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वेळेत वीजपुरवठा, प्रशासकीय कामातील दिरंगाई या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कृषी अधिकाऱ्यांना शेतकरीहिताचे निर्णय त्वरित अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले. तर पोलिस प्रशासनाला प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा जलद निपटारा करून जनतेला न्याय देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दारूबंदीबाबत आमदार लंघे यांनी विशेष लक्ष देत तहसील व गृह खात्याला स्पष्ट सांगितले की,
माझे जेवढे सहकार्य लागेल ते मी देण्यास तयार आहे, पण कारवाई झालीच पाहिजे. प्रत्येक विभागप्रमुखांनी आपल्या खात्याचा कारभाराचा सविस्तर अहवाल सादर करावा, तसेच कामात कोणतीही हायगय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. काही अधिकाऱ्यांना यावेळी थेट तंबीही देण्यात आली.