Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम | पुढारी

Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्यात अखेर महायुतीला अपयश आले आहे. भाजप, शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून ते केंद्रीय नेत्यांनी शांतिगिरी महाराजांना प्रत्यक्ष वा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत अर्ज माघारीच्या बदल्यात महामंडळापासून ते मंदिर समिती प्रमुख पदापर्यंतची आमिषे दाखविली. मात्र शांतिगिरी महाराज निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. सोमवारी(दि.६) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर, अनिल जाधव, निवृत्ती अरिंगळे यांनी माघार घेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठींबा दर्शविला. मात्र शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना शेवटच्या क्षणांपर्यंत यश मिळू शकले नाही. शांतिगिरी महाराज यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेत अर्ज माघारीची गळ घातली. परंतू महाराज निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. त्यामुळे अर्ज माघारीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. याबाबत शांतीगिरी महाराज म्हणाले की, ही निवडणूक जनता जनार्दनाने हातात घेतली आहे. आम्ही ठाम निर्धार केला आहे की, नाशिक लोकसभेची निवडणूक लढवायची आणि जिंकायची. त्यामुळे नाशिकमधून माघार घेण्याचा प्रश्न संपलेला आहे. महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या संपर्काबाबत ते म्हणाले की, सर्वांसोबत आमच्या चर्चा झाल्या आहेत. बाबांचा दरबार सर्वांसाठीच खुला असतो. ही निवडणूक विचारांची लढाई आहे. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुध्द राजकारणाचा, असा आम्ही नारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाच्याच विरोधात नाही. ही लढाई केवळ देशाच्या हितासाठी आहे, असे शांतिगिरी महाराज म्हणाले.
—-

होर्डींग्जद्वारे महायुतीला सूचक इशारा

महायुतीकडून उमेदवारी मिळेल, अशी शांतिगिरी महाराज यांना अपेक्षा होती. परंतू महायुतीने त्यांची मागणी अव्हेरली. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम राहिलेल्या शांतिगिरी महाराजांच्या समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी उभारलेले होर्डींग्ज चर्चेचा विषय बनले आहेत. ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’ असा मजकूर शांतिगिरी महाराजांच्या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून, एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा –

Back to top button