Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha | उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव | पुढारी

Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha | उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका समीप आली असताना नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरूच असून, नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून गुरुवारी (दि.२५) जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा ठराव करत उमेदवारीसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा व त्यात यश न आल्यास सर्वसंमतीने पक्षाचाच एक उमेदवार निश्चित करून अर्ज दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिकच्या जागेवरून महायुतीतील रस्सीखेच कायम आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला ‘ठाणे हवे की नाशिक’ या प्रश्नात अडकविल्यानंतर भाजपने नाशिकच्या उमेदवारीवरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीश्वरांची पसंती मिळूनही उमेदवारी घोषित होत नसल्यामुळे भुजबळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी, राष्ट्रवादी मागे हटण्यास तयार नाही. गुरुवारी शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी व निवडक कार्यकर्त्यांनी बैठक घेत नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच खरा दावा असल्याचा ठराव केला. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. शहर व जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सहा आमदार असल्यामुळे नाशिकची जागा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तातडीने जाऊन प्रस्ताव मांडावा. दिल्लीमधून आदेश येऊनही छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणून त्यांनी माघार घेतली. ही बाब महायुतीसाठी अत्यंत चुकीचा संदेश देणारी आहे. त्यामुळे भुजबळ यांनी पुन्हा उमेदवारी करावी यासाठी सर्वांनी एकत्रितरीत्या त्यांची मनधरणी करावी. अन्यथा त्यांच्या सहमतीने अन्य इच्छुकांपैकी एक उमेदवार निश्चित करून ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, माजी आमदार जयंतराव जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीला घरचा आहेर

महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे माजी आमदार जयवंत जाधव यांनी नाराजी व्यक्त करत महायुतीला घरचा आहेर दिला. प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित होऊन एक महिना लोटल्यानंतरही उमेदवार निश्चितीला कधी मुहूर्त लागणार असा सवाल म्हैसधुणे यांनी केला. बाळासाहेब कर्डक म्हणाले, भुजबळ यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर बैठक घेण्यासाठी आठ दिवस का लागतात हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. भुजबळ यांच्या नेतृत्वाचा कोणालाच फायदा झाला नाही का? त्यांचे मन वळवण्यासाठी कोणीही पुढे का गेले नाही, असा सवालही कर्डक यांनी केला.

भुजबळांना विरोध नाही, पण मीही तयार!

या बैठकीत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांच्या उमदेवारीला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. भुजबळ काका, पुतण्यांनी आपल्याला गत विधानसभा निवडणुकीत मदत केली आहे. मतदारसंघात फिरताना मी भुजबळांचाच संदेश मतदारांना दिल्याचा दावाही कोकाटे यांनी केला. आपण निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो, माध्यमांनी आपले नाव पुढे आणल्याचे सांगत, पक्षाने आदेश दिला तर, आपण निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

Back to top button