जळगावमध्ये 10 लाखांचे ड्रग्ज जप्त; पोलिसांची मध्यरात्री कारवाई, दोघांच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

जळगावमध्ये 10 लाखांचे ड्रग्ज जप्त; पोलिसांची मध्यरात्री कारवाई, दोघांच्या आवळल्या मुसक्या

जळगाव : भुसावळ येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या ड्रग्ज साठ्यानंतर आज (दि. 22) जळगाव शहरातील शाहूनगर मधून एमडी विक्री व पुरवठा करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ लाख 85 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापळा रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ शुक्रवार (दि. २२) मध्यरात्री दीड वाजता संशयित आरोपी इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला पथकाने अटक केली. त्याच्याजवळ तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन पुड्यांसह एकुण ९ लाख 85 हजार 780 रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. शिवाय त्याच्या जवळील दोन मोबाईलही जप्त केले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एमडी ड्रग्जचा साठा गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (वय-४०, रा. कंजरवाडा) यांच्या घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी गोकुळ उमप यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सुमारे ७२ लाख ८० हजार रूपये किंमतीचे ९१० ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातून दहा लाखाचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. भुसावळ पाठोपाठ जळगावातील कारवाईनंतर जिल्ह्यात ड्रग्ज संबधि मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

हेही वाचा :

Back to top button