नाशिक-बाेरिवली मार्गावर उद्यापासून धावणार ई-बस | पुढारी

नाशिक-बाेरिवली मार्गावर उद्यापासून धावणार ई-बस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एमएसआरटीसी) नाशिक-बाेरिवली मार्गावर बुधवारपासून (दि.१४) इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या नवीन ३५ आसनी बसमुळे नाशिक ते बोरिवलीचा प्रवास अधिक सुखकर व जलद होणार आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये ई-बसेसचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. ई-शिवाईनंतर महामंडळाकडे आता ३५ आसनी इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (दि.१३) ठाणे येथे एसटीच्या विविध मार्गावरील ई-बसेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर बुधवारपासून नाशिक-बोरिवली मार्गावर या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून मिळाली आहे.

एसटीच्या ताफ्यात दाखल झालेली ३५ आसनी ई-बस ही एकदा चार्जिंग केल्यानंतर २०० किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे. त्यानुसार नाशिक आगाराला गेल्या महिन्यात या प्रकारातील काही बसेस उपलब्ध झाल्या. सप्तश्रृंगगडावर या बसगाड्यांची चाचणी घेतल्यानंतर आता त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान, बोरिवली येथून इलेक्ट्रिक बस सोडण्यासाठी तूर्तास कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नाशिक विभागात महामार्ग बसस्थानक येथून या बसेस बोरिवलीकडे मार्गक्रमण करतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

टप्प्याटप्प्याने बसगाड्यांमध्ये वाढ
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे एसटी महामंडळाच्या जुन्या बसगाड्यांना बोरिवली गाठण्यासाठी विलंब लागतो. परंतु, नवीन ३५ आसनी बसगाडी ही ९ मीटरची आहे. एसटीच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. सकाळी ६ पासून प्रत्येक तासाला स्लॉटनुसार या बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद बघून भविष्यात या बसगाड्यांची संख्या १५ वर नेण्याचा महामंडळाचा मानस आहे. या नवीन बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व जलद होण्यास मदत मिळेल.

मार्ग                                                     प्रवासभाडे
ठाणे-बोरिवली                                            ६५ रु.
ठाणे-नाशिक(भिवंडी मार्गे)                           ३५० रु.
ठाणे-नाशिक (भिवंडी बायपास)                     ३४० रु.
बोरिवली – नाशिक                                      ४०५ रु.

Back to top button