कोरोना इफेक्ट : ऐन तारुण्यात वाढला हृदयविकाराचा धोका | पुढारी

कोरोना इफेक्ट : ऐन तारुण्यात वाढला हृदयविकाराचा धोका

नाशिक : सतीश डोंगरे

जगभर हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना महामारीचे पडसाद अद्यापही उमटत असून, कोरोनामुळे गंभीर बाधा झालेल्या रुग्णांमध्ये आता हृदयविकाराचा (heart attack) धोका वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनानंतर हृदयविकाराचे प्रमाण दुप्पटीने वाढले असून, १८ ते ३६ वयोगटात याचा सर्वाधिक धोका दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषत: तरुणांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये अचानकच लक्षणीय वाढ झाली आहे. तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तीलाही अचानक हृदयविकाराचा झटका येत असल्याने, वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चुकीचा आहार, निष्काळजीपणा यामागचे प्रमुख कारण असून, कोराेना काळात गंभीर बाधा झालेल्या रुग्णांनी खबरदारी म्हणून वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, कोरोना झालेल्या रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात उद्भवल्याने, रक्ताभिसरण संस्थेवर याचा परिणाम झाला आहे. त्यावेळी रक्त पातळ होण्याच्या गोळ्या उपचारानंतर किमान सहा महिने घ्याव्यात अशाप्रकारचा सल्ला डॉक्टरांकडून अनेकांना दिला होता. मात्र, त्याकडे बऱ्याच रुग्णांनी डोळेझाक केली. शिवाय आरोग्य तपासणीकडेही दुर्लक्ष केले. चुकीचा आहाराने त्यात आणखीनच भर पडल्याने, मायोकार्डिटिस नावाची दाहक प्रतिक्रिया होऊन हृदयाचे स्नायू कमकुवत होत असल्याच्या तक्रारी दुप्पटीने वाढल्या आहेत. विशेषत: तरुण वर्गांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, धुम्रपान देखील त्यास कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशात खबरदारी सर्वोत्तम उपाय असून, प्रत्येकाने आरोग्य तपासणी करण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहेे.

संबधित बातम्या : 

खबरदारी घ्या, हृदयविकार टाळा

– हृदयाची नियमित तपासणी

– निरोगी आहाराचे सेवण

– छातीत जडपणा, श्वासोच्छवासास त्रास झाल्याच दुर्लक्ष करू नये

– हृदयाचा आजार असलेल्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

– छातीत दुखण्याचा त्रास असेल तर अवघड क्रिया किंवा व्यायाम टाळावा

ही आहेत कारणे

– कोविड विषाणूमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे

– फास्ट फुडमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने शरिरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे

– व्यायामाअभावी शरिरात कोलेस्टॉलचे प्रमाण वाढणे

– शरीरात ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढणे

कोविड विषाणुमुळे गंभीर बाधा झालेल्या रुग्णांना उपचारानंतर पुढील काही महिने उपचार सुरू ठेवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. मात्र, त्याकडे बहुतांश रुग्णांनी दुर्लक्ष केले. परिणामी हृदयविकार वाढण्याचे ते कारण ठरत आहे.

– डॉ. आशुतोष साहु, कार्डिओलॉजिस्ट

 

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. कोरोना काळात रेमडेसिविर, फॅबिफ्ल्यु यासारखे औषधोपचार केलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करायलाच हवी.

– डॉ. हिरालाल पवार, कार्डिओलॉजजिस्ट

हेही वाचा :

Back to top button