नाशिकमध्ये वरुणराजाचा तडाखा, गणेशभक्त ओलेचिंब | पुढारी

नाशिकमध्ये वरुणराजाचा तडाखा, गणेशभक्त ओलेचिंब

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह सुरु झालेल्या जोरदार पावसाने मध्यरात्रीपर्यंत तब्बल तीन ते चार तास तडाखा दिला. दिवसभर कडक उन असल्याने सायंकाळी देखावे पाहण्यास बाहेर पडलेल्या हजारो नागरिकांना पावसात भिजावे लागले. जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील विविध तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पावसाचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे.

संबधित बातम्या

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज होता. दुपारनंतर उकाड्यात अधिकच वाढ झाली होती. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक व्यावसायिक, नागरीक यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील आठवडाभरात रिमझिम पडायला सुरुवात झाली होती. तर शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली. निफाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आदी तालुक्यांमध्ये वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दरम्यान, निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, कुंदेवाडी, रौळस, पिंपरी, कारसूळ, लोणवाडी, दावचवाडी, पिंपळगाव बसवंत, पालखेड मिरची आदी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दिंडोरी, मखमलाबाद, दरी-मातोरी, कळवण येथेही जोरदार पाऊस झाला.

जोरदार पावसाने कसारा-नाशिकदरम्यानची वाहतूक अतिशय संथ झाली. महामार्गावर अनेक ठिकाणी तळी निर्माण झाल्याने वाहुतक थंडावली होती. इगतपुरी-त्र्यंबक पट्ट्यात जोरदार पावसाने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा :

Back to top button