प्राथमिक शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटात फूट | पुढारी

प्राथमिक शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटात फूट

सोलापूर, संतोष सिरसट : राज्याच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये सर्वज्ञात असलेल्या माजी आमदार (कै.) शिवाजीराव पाटील यांच्या प्राथमिक शिक्षक संघामध्ये फूट पडली आहे. त्यांचे नातू शंभूराजे पाटील यांनी वेगळी भूमिका घेत चार जिल्ह्यांची वेगळी कार्यकारिणी जाहीर केली आहे.

राज्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या जवळपास तीन ते चार लाखांच्या आसपास आहे. या शिक्षकांची संघटना बांधण्याचे काम माजी आमदार पाटील यांनी केले होते. त्यानंतर पाटील यांच्यापासून फारकत घेत संभाजीराव थोरात यांनी वेगळा गट स्थापन केला होता. तेव्हापासून राज्यात प्राथमिक शिक्षक संघाचे शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात हे दोन गट तयार झाले होते. ज्याप्रमाणे शिक्षक संघात फूट पडली. त्याचप्रमाणे शिक्षक समितीमध्येही काही वर्षांपूर्वी फूट पडली होती.

आता त्यानंतर प्राथमिक शिक्षक संघामध्ये फूट पडली आहे. शिवाजीराव पाटील यांचे चिरंजीव माधवराव पाटील हे आता पाटील गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी लोकशाही मार्गाने सर्व जिल्हाध्यक्षांना न बोलवता नव्या राजाध्यक्षांची निवड केली. त्यावेळी आपल्याला त्यांनी विश्वासात घेतले नाही हे कारण पुढे करत शिवाजीराव पाटील यांचे नातू शंभूराजे पाटील यांनी स्वतंत्र गट तयार केला आहे.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सांगली, सातारा, सोलापूर व धुळे या चार जिल्ह्यांची जिल्हा कार्यकारिणीही जाहीर केली आहे. त्यामुळे शंभूराजे पाटील यांनी आपला सवता सुभा स्थापन केला आहे. शंभूराजे पाटील यांना जवळपास 16 ते 17 जिल्ह्यातील प्रमुख शिक्षक नेत्यांची साथ असल्याचे बोलले जात आहे. माधवराव पाटील व शंभूराजे पाटील यांचे एकमेकांशी न पटल्यामुळे नव्या संघटनेचा जन्म झाला आहे. सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणीही शंभूराजे पाटील यांनी जाहीर केली आहे. प्राथमिक शिक्षक संघाच्या शंभूराजे पाटील गटाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मुलगे यांची नियुक्ती केली आहे.

संभाजीराव थोरात गटाचा फायदा

प्राथमिक शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटामध्ये फूट पडल्याचा फायदा राज्यभर संभाजीराव थोरात यांच्या शिक्षक संघाला होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये शिवाजीराव पाटील गटातील काही नेत्यांनी नुकताच थोरात गटामध्ये प्रवेश केला आहे. राज्यभर हीच स्थिती राहण्याची शक्यता जाणकार शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

Back to top button