नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल | पुढारी

नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका प्रशासन अन् ठेकेदारांनी मिळून रस्ते दुरुस्तीचा मलिदा खाल्ल्याचा सातत्याने होत असलेला आरोप खरा ठरताना दिसत आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरील डांबर हे रिमझिम पावसातच वाहून गेले असून, खड्डे अन् चिखलात रस्ते शोधणे अवघड होत आहे. परिणामी या खड्ड्यांमधून वाट शोधताना नाशिककरांचे कंबरडे मोडत आहे.

गेल्या वर्षी कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते दुरुस्तीचा घाट उघड पडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली होती. मात्र, अशातही महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीचाच कित्ता गिरवत यंदाही रस्ते दुरुस्तीच्या नावे मलिदा खाण्याचा सिलसिला कायम ठेवला. मनपा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देताना रस्ते दुरुस्तीपेक्षा टक्केवारीवरच अधिक भर दिल्यानेच रस्त्यांची दैना झाल्याचा आरोप आता नाशिककरांकडून केला जात आहे. अजूनपर्यंत नाशिक शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. दमदार पाऊस पडल्यास रस्त्यांची काय स्थिती होऊ शकेल, याचा अंदाज बांधतानाही अंगावर शहरा येत असल्याचे अनेक नाशिककरांकडून बोलून दाखविले जात आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असताना महापालिकेचा बांधकाम विभाग मात्र कागदोपत्री दुरुस्तीचे घोडे नाचवत आहे. ज्या कंत्राटदारांकडून रस्ते दुरुस्ती केली, त्यांनी हात वर केल्यामुळे नाशिककरांना यंदाही खड्ड्यांतूनच वाट शोधावी लागणार आहे.

चिखलात रस्ते हरवले

गॅस पाइपलाइनसाठी जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांवरील मातीचे ढिगारे सारण्याची तसदी अजिबातच घेतली गेली नसल्याने या मातीचा रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे चिखलात रस्ते पूर्णपणे हरवले असून, या निसरड्या रस्त्यांवर मार्गक्रमण करताना अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत.

दिव्याखाली अंधार

राजीव गांधी भवन मुख्यालयाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची बिकट अवस्था असून, या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषत: रामायण बंगल्यासमोरील रस्त्याची तर खूपच बिकट स्थिती आहे. अशात आपल्या मुख्यालयालगतचे रस्ते सुस्थितीत ठेवणे महापालिकेला शक्य नसताना, शहरातील इतर रस्त्यांबाबत काय अपेक्षा ठेवावी, अशा भावनाही नाशिककरांकडून बोलून दाखविल्या जात आहेत.

हेही वाचा :

Back to top button