Dhule Accident : गुजरात परिवहनच्या बसची दुचाकीस धडक, दोन तरुण ठार | पुढारी

Dhule Accident : गुजरात परिवहनच्या बसची दुचाकीस धडक, दोन तरुण ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : गुजरात परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील दोन तरुण ठार झाले आहेत. या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील तरडी व बभळाज दरम्यान हा भीषण अपघात झाला. गुजरात परिवहनाची (जीजे १८ झेड ८१३३) या क्रमांकाची बस चोपडा येथुन अहमदाबादकडे जात होती. या भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने बभळाज कडून तरडीकडे जाणाऱ्या (एम‌एच १८ बीएफ १८८७) या दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील भागवत कालिदास पाटील (वय ४५) व विलास मंगल पाटील (वय ४०) हे तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शिरपूर उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार होण्यापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर स्पष्ट केले.

दोन्ही तरुण बभळाज येथुन तरडी येथे घरी जात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. या अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजुंनी रहदारी खोळंबली होती. बभळाज व तरडी येथील गावकऱ्यांनी रहदारी सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळाल्याने थाळनेर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यानंतर रहदारी सुरळीत करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button