नाशिक : शिवजयंतीला डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता | पुढारी

नाशिक : शिवजयंतीला डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांनी देखावे उभारताना अनेक मंडळांनी डीजे लावले होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण झाले असून, पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहर पाेलिस डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे ऑपरेटर्सवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी ध्वनिमर्यादेच्या नोंदी घेतल्या असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होतात की समज मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी (दि.१४) शहरातील शिवजन्माेत्सव समिती व शिवजयंती मिरवणूक पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कायदेशीर पूर्तता पूर्ण करून व नियमांच्या चौकटीत शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले हाेते. त्यानुसार बहुतेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची परवानगी घेत फलकबाजी केली होती. मात्र, डीजे लावण्याची पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याचे समोर येत आहे. शहरातील पंचवटी, नाशिकराेड, अंबड, सातपूर, म्हसरूळ, आडगावसह विविध भागांतील शिवजयंती देखावे व मंडळांजवळ डीजेचा दणदणाट सुरू होता. ध्वनिपातळीची मर्यादा ओलांडून डीजे सुरू होते. शहर पोलिसांनी डीजेच्या आवाजाची नाेंद घेतल्याने ते याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आधी २०१९ मध्येही डीजेचा दणदणाट करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पाेलिस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांजवळील ध्वनिपातळीच्या नाेंदी घेण्यात आल्या आहेत. याबाबत काेणता निर्णय घ्यायचा ते कळविले जाईल.

– किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ १

हेही वाचा : 

Back to top button