नाशिक : दंड घ्या, मात्र समुपदेशन नको; हेल्मेट नसलेल्यांची मागणी | पुढारी

नाशिक : दंड घ्या, मात्र समुपदेशन नको; हेल्मेट नसलेल्यांची मागणी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : हेल्मेट नसल्याकारणाने अपघाती मृत्यू वाढत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे शहर पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट नसलेल्यांना गुरुवारपासून (दि.९) ट्रॅफीक एज्युकेशन पार्क येथे सुमारे दोन समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे दैनंदिन कामकाज खोळंबल्याची भिती लक्षात येताच अनेक चालकांनी ‘साहेब, दंड घ्या! मात्र समुपदेशन नको’ अशी विनंती केली. मात्र पोलिसांनी पहिल्या सत्रात ४० विना हेल्मेट चालकांना ताब्यात घेत समुपदेशन केंद्रावर नेले. त्यानंतर प्रमाणपत्र देऊन पुन्हा सोडण्यात आले.

शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले जाते. पेट्रोल भरणाऱ्या चालकांनी हेल्मेट घातले नसल्यास त्यांना पेट्रोल दिले जात नाही. त्याचप्रमाणे आता शहर पोलिसांनी नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून हेल्मेट नसलेल्या चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई न करता समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळपासून वाहतूक पोलिसांचे भरारी पथक शहरात फिरत होते. मुंबईनाका येथे पोलिसांनी मोहिम राबवून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना पकडले. सुरुवातीस चालकांना दंड भरावा लागेल असे वाटले. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवले. तसेच समुपदेशनाची पुर्वकल्पना दिली. त्यामुळे चालक गोंधळले.

दोन तास समुपदेशनासाठी वेळ गेला तर दैनंदिन कामकाज खोळंबेल ही शक्यता लक्षात येताच अनेक चालकांनी साहेब दंड भरतो मात्र समुपदेशन नको अशी विनंती करीत सोडण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी ४० चालकांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कमध्ये नेले.

तेथे सुमारे दोन तास समुपदेशन करण्यात आल्यानंतर प्रमाणपत्र देत चालकांची सुटका केली. सकाळच्या सत्रात बँक कर्मचारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिकांना पकडण्यात आले. अनेकांनी हेल्मेट नसल्याची कारणे दिली. मात्र पोलिसांनी कारणांची शहानिशा करून त्यांना समुपदेशनासाठी पाठवले. या कारवाईने दुचाकी स्वारांचे धाबे दणाणले होते. त्यांनी मुख्य रस्ता सोडून कॉलनी रस्त्याने जाणे पसंत केले. तर अनेकांनी हेल्मेट घालण्यास पंसती दिली. सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ यावेळेत समुपदेशन करण्यात आले.

अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे. जेणेकरून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिस वाहनातून आणून समुपदेशन केले जात आहे. प्रमाणपत्र वितरीत झाल्यानंतरच त्यांना त्यांचे जप्त वाहन परत केले जातील.
सीताराम गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

 

मी पुणे येथून कामानिमित्त आलाे होेतो. मी पुण्यात हेल्मेट घालूनच दुचाकी चालवतो. नाशिकला आल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट होते. मात्र मी ते घातले नाही. ही माझी चुकी होती. मात्र समुपदेशनात चांगली माहिती मिळाली. तसेच हा उपक्रम चांगला आहे. यापुढे मी हेल्मेट कायम घालत जाईल.
राहुल खर्चे, नोकरदार, पुणे.

Back to top button