जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका
![भुसावळ बातमी,www.pudhari.news](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/09/15113005/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80.jpg)
जळगाव : भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील व निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याची चर्चा असून फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मधूबनपासून काही अंतरावर असलेल्या जागेवर निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी, एलसीबीचे कर्मचारी तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांनी धाव घेतली. मयत महिलेच्या अंगावरही एकही कपडा आढळून न आल्याने महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याचा दाट संशय आहे.
पोलिसांनी मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे. पीएम रिपोर्टनंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होताच पुढील तपासाला गती येणार आहे. यावेळी सपोनि हरिष भोये, पोहेकॉ. विजय नेरकर, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, निलेश चौधरी, प्रशांत सोनार आदींनी भेट देऊन पाहणी केली.