धुळे : केवडीपाड्यात विदारक स्थिती! नऊशे लोकसंख्येसाठी एकच विहीर; चार दिवसांत फक्त दोन हंडे पाणी | पुढारी

धुळे : केवडीपाड्यात विदारक स्थिती! नऊशे लोकसंख्येसाठी एकच विहीर; चार दिवसांत फक्त दोन हंडे पाणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील पांझरा नदीचा उगम असलेल्या शेंदवड भवानी पैकी केवडीपाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसह अन्य स्त्रोतांची पातळी खालावत चालली आहे. आदिवासीबहुल पेसा क्षेत्रातील केवडीपाड्याची लोकसंख्या सरासरी ८९५ असून येथील लोकांचा उदरनिर्वाह शेती, मजुरीतून भात, नागली ही मुख्य पिके घेतली जातात. पिंपळनेरपासून २० किलोमीटरवर पश्चिम पट्ट्यातील केवडीपाट्याजवळ पांझरा नदीचे उगमस्थान आहे तर तीन ते चार किलोमीटरवर गुजरात राज्याची सीमा आहे.

टंचाईशी खडतर सामना

आदिवासी पश्चिम पट्यातील लहानशा केवडीपाडा गावात अनेक दिवसांपासून पाणी टंचाईशी सामना करत आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर खडकाळ नाल्यात आहे. तसेच पाड्यातील तीन हातपंप अक्षरशः कोरडे पडले आहेत उर्वरित एकमेव हातपंप असुन गावात एकच विहीर आहे. त्यात दर चार दिवसांनी दोन ते तीन हंडे पाणी देणारी विहीर टंचाईत तारणहार ठरते आहे. पाड्याच्या पश्चिमेला बऱ्याच अंतरावर असलेला एकमेव हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होते. चराईनंतर जंगलातून परतल्यावर जनावरेही या हातपंपावर आपली तृष्णा भागविण्यासाठी येतात. या पंपाजवळील डबक्यात हातपंपाचे पाणी टाकल्यावर जनावरांची तहान भागते हातपंपस्थळी पाणी संकलीत झाल्यानंतरच महिला वर्गाला टप्प्याटप्प्याने पाणी मिळते.

नशिबी हालअपेष्टा एकाच हातपंपामुळे नऊशे लोकसंख्येला मिळणारे पाणी आणि त्यासाठी होणाऱ्या हालअपेष्टांची माहिती देताना ग्रामस्थ उदिग्न होतात. या दुर्लक्षित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ कोमा मावची, मिसरीबाई बारिस, नोपरीबाई कुवर, रमिला कुवर, सोकाबाई बारिस रोना मावळी, सुरेखा कुवर, शांती बहिरम, छगन बहिरम, जेठ्या कुवर, लाजरस मावळी, मान्या कुवर, एकनाथ कुवर, दिनेश राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दानीयल कुवर, काकाजी पानेश, संदीप देवरे, राऊत, मिराजो माळी, विजय द्यानेश, आदी गावकऱ्यांनी यंत्रणेकडे मागणी केली आहे.

धुळे जिल्ह्यात अनेक योजना असूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

धुळे जिल्ह्यात पाणीपुरवठ्या संदर्भात किती तरी योजना आल्या आणि पाण्यासारखा अमाप खर्च होऊनही काही गावे आणि आदिवासीबहुल पाड्याच्या नशिबी टंचाईत, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण असते. यात जीवनवाहिनी ठरलेल्या पांझरा नदीच्या उगम क्षेत्रातील केवडीपाडा गांव सध्या भीषण टंचाईशी सामना करत आहे.तेथे जनावरांसह नऊशे लोकसंख्येसाठी केवळ एकच हातपंप आणि चार दिवसांत दोन हंडे पाणी देणारी विहिर कशीबशी गावकऱ्यांची तहान भागवत असल्याची विदारक स्थिती आहे.

हेही वाचा

Back to top button