यकृत दान : जिगरबाज भावाने वाचविले बहिणीचे प्राण | पुढारी

यकृत दान : जिगरबाज भावाने वाचविले बहिणीचे प्राण

डांगसौंदाणे (नाशिक); महेंद्र सोनवणे : यकृत दान करून भावाने आपल्या बहिणीचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द हे गाव सतत अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. महाराष्ट्रात एक आदर्श गाव म्हणून या गावाची ख्याती आहे. महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे.

या गावाने आपला आदर्शपणा जपत अनेक वेळा अनेक चांगल्या कामांनी या गावाचा नावलौकिक मिळवला आहे.

याच आदर्शपणाची परंपरा सतत ठेवत अजून एक माणुसकीचा व बहीण-भावाच्या नात्याचा आदर्श किकवारी खुर्द येथील येथील

भावाने सर्वांसमोर ठेवला आहे. या भावाने स्वतः चे यकृत (लिव्हर) आपल्या आजारी असणाऱ्या बहिणीस दान केले. आणि तिचे प्राण वाचविले आहे.

किकवारी खुर्द येथील धनंजय काकुळते (वय ३५) यांनी आपल्याहून मोठी असणारी विवाहित बहिण सुनिता सावकार यांना यकृत दान करून पुनर्जन्म दिला.

धनंजय काकुळते यांची मोठी बहीण जोरण येथे वास्तव्यास आहे, मात्र काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्याने नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र, नाशिक येथील डॉक्टरांनी तात्काळ मुंबईत हलविण्यास सांगितले. त्यानंतर नातलग व कुटुंबीयांनी त्वरित मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल केले.

अधिक वाचा :

तेथील डॉक्टरांनी सुनीता सावकार यांचे यकृत (लिव्हर) काविळमुळे निकामी झाल्याचे व त्यांच्या जीवितास धोका असल्याचे सांगितले.

यकृतासाठी तत्काळ डोनर मिळणे व यकृत मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे सुनिता यांच्या जीवितास धोका वाढत होता. अशा वेळी काय करावे? असा नातलगांना समोर प्रश्न उभा राहिला.

त्यावेळी मात्र तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ धनंजय काकुळते यांनी मी माझ्या बहिणीला यकृत दान करून तिचा जीव वाचवेन असा अट्टाहास धरला.

मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी यावर निर्णय घेतला व धनंजय काकुळतेंच्या कुटुंबीयांची संमती घेऊन डॉ. प्रशांत रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तज्ञ सर्जन डॉक्टरांच्या मदतीने सलग १२ तास धनंजय व सुनीता या दोघांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन्ही शस्त्रक्रिया उत्तम रित्या पार पडले असून सुनीता यांच्या जिवितास धोका टळला आहे. आज दोघांची प्रकृती स्थिर आहे.

धावपळीच्या युगात भाऊ-बहिणीच्या नात्याचा दुरावा निर्माण झालेला आपण समाजात बघत आहोत.

दिपावली, भाऊबीज व रक्षाबंधन या सणांना भाऊ-बहिणीच्या नात्याची ओल टिकून राहावी म्हणून संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतो मात्र सध्याच्या काळात स्वतःपुरतं बघणारे अनेक भाऊ-बहीण समाजात आहेत.

मात्र या भावाने बहिणीसाठी जिवाचा धोका पत्कारुन बहिणीला नवं जिवन दिलं आहे. इतकचं नाही तर आर्थिक मदत सुद्धा केली आहे, या घटनेमुळे संपूर्ण समाजात व जिल्ह्यात एक चर्चेचा विषय बनला आहे व बहीण-भावाच्या नात्याची ओल आणि जिव्हाळा या प्रति स्पष्ट झाला आहे.

बहिण भावाच्या नात्याच्या प्रेमाची पवित्रता जपली आहे. स्वतःच्या जिविताचा धोका पत्कारुन बहिणीसाठी असा जिगरबाज भाऊ असणे दुर्मिळच!

अधिक वाचा :

तीन बहिनींना एकुलता एक भाऊ असणाऱ्या धनंजय काकुळतेला दोन मुली आहेत. लहान मुलगी तर केवळ दोन महिने वयाची आहे. धनंजयच्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांनी नमूद केल्यानंतरही त्यांच्या पत्नी सौ. निलिमा यांनीही कोणताही विरोध न करता शस्त्रक्रियेस व यकृत दानास परवानगी दिली.

दोघांची प्रकृती स्थिर असून मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.

धनंजय काकुळते व काकुळते कुटुंबीयांनी उचललेल्या या खंबीर पावलाबद्दल परिसरात व जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. श्री. धनंजय काकुळते यांचे व परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

माझ्या बहिणीचा जीविताचा धोका लक्षात घेता तिला त्वरीत यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे बनले होते, जितका वेळ जास्त जाईल तितका धोका अधिक होता म्हणून मी माझा वैयक्तिक कोणताही विचार न करता बहिणीला जीवनदान देणे हे माझे कर्तव्य होते म्हणून मी एक यकृत दानाचा निर्णय घेतला व माझ्या बहिणीचा मी एकुलता एक भाऊ असल्याने ते माझे कर्तव्य होते असे मी समजतो.

– धनंजय काकुळते (यकृत दाता)

माझा एकुलता एक भाऊ असल्याने माझ्या आई वडिलांनी तो नवसाने मागितला आहे, त्याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्याचा जीव धोक्यात घालणे मला पटत नव्हते. पण मात्र त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याने मला त्याचे यकृतदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे मी आज एक नवं जग पाहत आहे व माझा पुनर्जन्म झाला व माझ्या भावाने मला आयुष्यभराची भाऊबीज दिली. मला असा भाऊ मिळणे मी माझे भाग्यच समजते. त्याचे उपकार माझ्याकडून कधीच फेडले जाणार नाही.

– सुनिता सावकार (यकृत प्रत्यारोपण रुग्ण)

Back to top button