राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली | पुढारी

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुष्काळसद़ृश परिस्थिती निर्माण झाली असून ‘पाऊस पडावा, यासाठी आपण देवाला प्रार्थना करू. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत प्रश्न मांडला आहे. कृत्रिम पाऊस पाडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र, पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात 21 पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याचे संकेत दिले आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 22 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची चाहुल लागत असून, सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस तरी पाडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरू असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. कृत्रिम पाऊस पाडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशी ही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

एकनाथ खडसे यांनी केली मागणी

राज्यात पावसाने ओढ दिली असल्याने पिके धोक्यात आली आहेत. ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करून त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. दुष्काळाचे भीषण वास्तव समोर असताना सरकार मात्र त्याबाबत उदासीन आहे. या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये तत्कालीन सरकारमध्ये असताना महसूलमंत्री म्हणून राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली होती, असे खडसे यांनी नमूद केले आहे.

Back to top button