नंदुरबार : शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरुन वाद! कोयत्याने वार करत खून, दोन जखमी | पुढारी

नंदुरबार : शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरुन वाद! कोयत्याने वार करत खून, दोन जखमी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरून झालेल्या वादात कोयत्यासह दगड-काठीने एकाचा खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अन्य दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडगाव पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांना अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ७ जुलै) रात्री सात वाजताच्या दरम्यान कामोद बु गावात दिनेश रमेश पावरा (वय 36, रा कामोद बु//, ता. धडगाव) यांच्या घराजवळील नाल्याजवळ रमेश दादला पावरा (वय 50 वर्षे, रा कामोद बु ता. धडगाव) आणि आरोपी शिवया दादला पावरा यांच्यात शेतीच्या सामाईक बांदावरील सागाच्या झाडांच्या हिस्से वाटणीवरुन वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि त्याप्रसंगी रमेश दादला यांच्यावर थिक्या दादला पावरा यांने लोखंडी कोयत्याने अंगावर वार करुन गंभीर जखमी केले. दुसरा आरोपी सुनिलने काठीने तर, सायलीबाई हिने दगडाने घाव केले. तसेच अन्य सात आठ जणांनी दगडाने व हाता बुक्क्यांनी मयताच्या पाठीवर व पोटावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. दिनेश व अंकेश हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील हाताबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, जखमी रमेश दादला यांना धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हातापायावर आणि डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अधिक रक्त स्त्राव होत होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक आय. एन. पठान हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून त्यांनी ताबडतोब अटक सत्र राबवले.

शनिवारी (दि ८) दुपारी तीन वाजता या प्रकरणी दिनेश रमेश पावरा (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली. थिक्या दादला पावरा, सायलीबाई थिक्या पावरा, सुनिल थिक्या पावरा, गण्या पाडक्या पावरा, दादला पाडक्या पावरा, गिलदार पाडवया पावर, खेमा गण्या पावरा, गुलाब गण्या पावरा, रोहीदास दादला पावरा, खात्र्या उता या पावरा, रामदास गिलदार पावरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Back to top button