नाशिक : शहरातील १०४ झोपडपट्ट्या होणार अधिकृत | पुढारी

नाशिक : शहरातील १०४ झोपडपट्ट्या होणार अधिकृत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात १५९ झोपडपट्ट्या असून, त्यातील १०४ झोपडपट्ट्या आजवर अनधिकृत गणल्या गेल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार या झोपडपट्ट्या आता अधिकृत होणार आहेत. या झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, ४५ हजारांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. नवीन घरांसह मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, झोपडपट्टीवासीयांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

शहरातील १०४ झोपडपट्ट्या नियमित कराव्यात, याकरिता आमदारांनी विधिमंडळात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर महापालिकेने अघोषित १०४ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी २०११ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक महापालिका हद्दीत एकूण १५९ झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी ५५ झोपडपट्ट्या अधिकृत घोषित झाल्या आहेत. या अधिकृत झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या माध्यमातून घरकुल योजनेसह विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, १०४ झोपडपट्ट्या अनधिकृत ठरविण्यात आल्याने, येथे सोयीसुविधांची वानवा आहे. या १०४ पैकी खासगी जागांवर ८२, महापालिकेच्या जागेवर ६, तर शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या आहेत. यातील काही झोपडपट्ट्यांचा न्यायालयीन वादही सुरू आहे.

दरम्यान, भाजप आमदार देवयांनी फरांदे आणि सीमा हिरे यांनी या अघोषित झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाबाबत गेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. झाेपडपट्टी निर्मूलन योजनेत १ जानेवारी २००० पर्यंतचे झोपपट्टीधारक पात्र ठरल्यानंतर आता २०११ पूर्वीच्याही सर्व झोपडपट्टीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अंतर्गत नाशिकमधील १०४ झोपड्या अधिकृत करण्याचा मानस असून, तसेच आदेश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. दरम्यान, आदेश प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून, लवकरच त्या नियमित केल्या जाण्याची शक्यता आहे.

झोपडपट्ट्यांची स्थिती

शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या – १५९

घोषित झोपडपट्ट्या – ५५

अघोषित झोपडपट्ट्या – १०४

१०४ पैकी खासगी जागांवर ८२, मनपा जागेवर ६, शासकीय जागेवर १६ झोपडपट्ट्या.

१५९ झोपडपट्ट्यांमध्ये ४१ हजार ७०७ झोपड्या

५५ हजार ५२० कुटुंबीयांचे घरकुलासाठी अर्ज

४५ हजार कुटुंबांचे अघोषित झाेपडीत वास्तव्य

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या नगररचना विभाग, मिळकत विभाग, भूसंपादन व झोपडपट्टी समन्वयक विभागाच्या वतीने संयुक्त सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या समितीला सादर केला जाणार आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा प्रशासक, मनपा

हेही वाचा :

Back to top button