Nashik : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिकमध्ये, पहिलाच दौरा | पुढारी

Nashik : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिकमध्ये, पहिलाच दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बैस पहिल्यांदाच नाशिकला येणार असल्याने यंत्रणांकडून दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

राज्यपाल रमेश बैस यांचे सकाळी १० च्या सुमारास त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनच्या हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रवाना होतील. त्यानंतर पहिने (ता. त्र्यंबकेश्वर) या गावाला ते भेट देतील. त्यानंतर नाशिक शहरात त्यांचे आगमन होणार आहे. सर्वप्रथम कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तेथून सार्वजनिक वाचनालयाला ते भेट देतील. या भेटीनंतर पंचवटीमधील श्री काळाराम मंदिरात राज्यपाल रामाचे दर्शन घेतील. दुपारी 3 नंतर राज्यपाल हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण करतील.

राज्यपाल बैस हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दाैऱ्यावेळी कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. शहरातील कार्यक्रमांदरम्यान राज्यपालांसमवेत व्यासपीठावर कोण-कोण उपस्थित राहणार येथपासून ते त्यांचा ताफा कोणत्या रस्त्याने जाणार यासंदर्भात सूक्ष्मस्तरावर प्रशासनकडून नियोजन केले जात आहे. त्यासाठी पोलिस व संबंधित यंत्रणांची मदत घेण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button