नाशिक पदवीधर निवडणूक : अर्ज माघारीसाठी आज अंतिम मुदत | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : अर्ज माघारीसाठी आज अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी (दि.१६) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष रिंगणात उतरविले. तर भाजपने शेवटपर्यंत त्यांचा उमेदवार दिला नाही. त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात उरलेला नाही.

सरकार, भाजपमध्ये फेरबदलाचे संकेत.!

पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेला हा मतदारसंघ काबिज करण्यासाठी २९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर ७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे रिंगणात २२ उमेदवार शिल्लक आहेत. दरम्यान, तांबे पित्रा-पुत्रांनी दिलेल्या धक्क्यातून काँग्रेस सावरते आहे. तर भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेने (ठाकरे गट) पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने अद्याप पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही. परिणामी मविआमध्येच सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (दि. १६) किती उमेदवार माघार घेता यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा :

Back to top button