नंदुरबार : तब्बल २८ शाळा फोडणारी टोळी अखेर जेरबंद - पुढारी

नंदुरबार : तब्बल २८ शाळा फोडणारी टोळी अखेर जेरबंद

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल २८ शाळा, कार्यालयांमधे घरफोडीचे सत्र घडले. संगणक व तत्सम महत्वाचे साहित्य चोरण्यासाठी थेट जिल्हा परिषद शाळांना लक्ष बनवून घरफोडी करणारी टोळी कार्यरत असल्याचे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासामुळे उघडकीस आले. यातील १८ गुन्ह्यांमधील टोळीचा सहभाग उघड झाल्यावर त्यांना बेड्या ठोकल्याअसून ३ लाख ७२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक पी. आर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाची सूत्रे हातात घेतल्यानंतर उघड मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. मागील काही महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून इनव्हर्टर, बॅटरी व एलईडी टीव्ही चोरी करण्याचे अनेक प्रकार घडले. त्या विषयी गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत, असे या आढावाप्रसंगी अधीक्षक पी.आर.पाटील यांना आढळून आले.

तसेच चारी झालेल्या जिल्हा परिषद शाळेमधील चोरीची पध्दत ही एकच असून चोरी करणारी टोळी देखील एकच असल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावर पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषद शाळेतील घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.

त्यानुसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासचक्र फिरवले. तेव्हा दि. २३ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चिरडे ता. शहादा गावात एक इसम कमी किमतीत व विना बिल पावती इनव्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून चिरडे येथे कारवाईसाठी पाठविले.

वेशांतर करून एकाला ताब्यात घेतले

पथकाने चिरडे ता. शहादा येथे वेशांतर करून सापळा रचून संशयीत इसमास इनव्हर्टर व बॅटरीसह ताब्यात घेतले. सदर इसमाने त्याचे नाव सोमनाथ ऊर्फ सोमा काशिनाथ दशरथ वय २१ रा. सुलवाडे ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने अजय आंबालाल मोरे वय २१ रा. सुलवाडे ता. शहादा व अजय ऊर्फ टाईगर राजू पावरा वय-२२ रा. ब्राम्हणपुरी ता. शहादा यांची माहिती दिली. यांच्यासह सुलवाडे व ब्राम्हणपुरी गावातील इतर साथीदारांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा फोडण्याचा क्रम त्यांनी चालवला होता. तशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिली.

आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल २८ शाळा आणि अन्य कार्यालयांमधे त्यांनी अशी घरफोडी केली असून यातील १८ चोर्‍या उघडकीस आल्या आहेत. व ८ चोर्‍यांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले, असेही ते म्हणाले.

या शाळेत झाली चोरी

जिल्हा परिषद शाळा, जवखेडा ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, पिप्री ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, गोगापूर ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, पाडळदा ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, होळ मोहिदा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा तिखोरा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, परिवर्धा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, सावखेडा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, गोदीपुर ता, शहादा, जिल्हा परिषद शाळा, भादे ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, डामरखेडा ता. शहादा, ग्राम पंचायत कार्यालय, सावखेडा ता. शहादा, तिखोरा येथील मंदीर चोरी ता. शहादा, ब्राम्हणपुरी येथील तेलाच्या टाक्या चोरी ता. शहादा, शेतकी विद्यालय, कळंब ता शहादा, टवळाई ता. शहादा येथील ऍल्युमिनीयम तार चोरी,रायखेड ता. शहादा येथील टायर चोरी याचा समावेश आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक रविंद्र कळमकर, पोलिस नाईक गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले यांनी ही तपास कामगिरी पार पाडली. याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचलत का :

कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी त्यांच्याच ऐतवडे बुद्रुक गावात उभ्या केलेल्या शाळेला भेट

Back to top button