मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय असलेल्या कोस्टल रोडचे (Mumbai Coastal Road) ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. मलबार हिल बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
२४ तास सुरू कामामुळे नोव्हेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होईल, असा विश्वास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ पासून या रस्त्यावरून गाड्या धावणार असल्याचे स्पष्ट होते. (Mumbai Coastal Road)
मुंबईतील वाहतूक कोंडीला पर्याय विशेषतः पश्चिम उपनगरात वाहनचालकांचा वाहतूक कोंडीत होणारा खोळंबा लक्षात घेऊन, कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) उभारण्यात येत आहे. शिवसेनेचा विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल प्रयत्नशील आहेत. रस्ते, पूल, बोगदे अशा विविध मार्गे मरीन ड्राईव्ह ते कांदिवली असा ३५ किमी लांबीचा हा रस्ता आहे.
या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हे काम मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. ९.९८ किलोमीटर लांबीच्या या कामातील ४० टक्के का पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.