नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा | पुढारी

नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सहकार संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगितीचा आदेश मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात सादर केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर ॲड नॉनटीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर पगारदार कर्मचाऱ्यांची सर्वांत मोठी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एनडीएसटी’वर निवडून जाण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत वर्षभरापूर्वीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. पतसंस्थेच्या २१ जागांसाठी १७ जुलैला मतदान होणार होते. त्यासाठी 55 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना अतिवृष्टीमुळे ‘एनडीएसटी’सह राज्यातील ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता. तेव्हापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज्य शासनाने स्थगनादेश मागे घेतल्याने ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा धुराळा पुन्हा एकदा उडणार आहे. सत्ताधारी गटातर्फे टीडीएफ-प्रगती पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, गोरख सोनवणे, मधुकर भदाणे, सुरेश शेलार, नानासाहेब देवरे, रवींद्र मोरे, रवींद्र जोशी, टी. एम. डोंगरे, ई. के. कांगणे, माेहन चकोर करत आहेत. तर विरोधी गटाने एनडीएसटी विकास समिती पुरस्कृत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल जाहीर केला. या पॅनलची धुरा श्याम पाटील, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, डी. यू. अहिरे, पुरुषोत्तम रकिबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, प्रमोद पाटील यांच्याकडे आहे.

राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक स्थगनादेश मागे घेण्याचे पत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. ३० सप्टेंबरपर्यंत स्थगनादेशाची मुदत असून, त्यानंतरही पेच कायम राहिल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाईल. – मोहन चकोर, नेते, टीडीएफ-प्रगती पॅनल.

दोन्ही पॅनलकडून प्रचार सुरूच

‘एनडीएसटी’च्या निवडणूक लांबणीवर पडल्यानंतरही दोन्ही पॅनलकडून गेली दोन महिने प्रचार सुरूच आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांसह मागील पाच वर्षांतील कारभाराचे वाभाडे काढण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून पारदर्शक कारभाराचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत कायम आहे.

हेही वाचा:

Back to top button