नाशिक : शहरात खड्डे बुजविण्यास वेग | पुढारी

नाशिक : शहरात खड्डे बुजविण्यास वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने विश्रांती घेताच महापालिकेकडून रस्त्यांची डागडुजी विशेषत: खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबतचे आदेश दिले होते. खड्डे बुजविण्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे आणि गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर, विसर्जन मार्गावर विशेष लक्ष द्यावे, अशाही सूचना आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सहा विभागांत डांबर आणि खडी वापरून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामावर अभियंत्यांचे पूर्ण लक्ष असून, त्याबाबतच्या सूचना कामगारांनाही देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नाशिक पूर्व विभागात प्रभाग 23, प्रभाग क्रमांक 30, पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 7 मधील रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. तसेच सातपूर विभागातील प्रभाग 8 मधील गंगापूर रोड तसेच गंगापूर धबधबा येथील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. प्रभाग 9 मध्ये मुख्य रस्ते आणि चौकांमधील खड्डे बुजविण्यात आले आहेत. पेठ रोड भागातही खड्डे बुजविण्यात आले. सातपूर प्रभाग क्रमांक 26 खुटवडनगरमध्ये मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. नवीन नाशिक विभागात अंबड एमआयडीसीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त उपनगरमध्ये रमाई आंबेडकर हॉलमध्ये दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button