नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री | पुढारी

नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत नाशिक शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेतर्फे सहा विभागांत गेल्या आठवडाभरात 46 हजार 416 तिरंग्यांची विक्री केली. त्याद्वारे 9 लाख 74 हजार 736 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तसेच देशभक्ती तेवत राहावी आणि या लढ्यात योगदान देणार्‍या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे, यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने विभागीय महसूल आयुक्तालयाकडून दोन लाख तिरंगा झेंडे खरेदी केले आहेत. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रांवर तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून, तिरंगा ध्वज प्रत्येकी 21 रुपयांत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांना तिरंगा खरेदी करण्याचे आवाहन करताना महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीदेखील तिरंगा खरेदी करणे आवश्यक आहे.

त्यामुळेच सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तिरंगा खरेदीचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत. क्रेडाई, नरेडको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना तसेच निमा, आयमा, नाइस या संघटनांसह शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनादेखील महोत्सवात सहभागी करून घेतले जात आहे.

 

Back to top button