धुळे : शाखा अभियंता 'लाचलुचपत'च्‍या जाळ्यात

धुळे; पुढारी वृत्तसेवा: पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २ लाख २० हजाराची लाच घेताना शाखा अभियंता मुरलीधर पाटील यांना  रंगेहाथ पकडण्‍यात आले. लाच घेताना शाखा अभियंत्यास रंगेहाथ पकडल्‍याने पाटबंधारे विभागात खळबळ माजली आहे.

पाटबंधारे विभागाच्या नवापूर तालुक्यातील रंगवली प्रकल्पाचे संरक्षक भिंत व पुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या संबंधित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराने बिल काढण्यासाठीची कार्यवाही केली होती. यासाठी त्यांनी शाखा अभियंता मुरलीधर पाटील यांच्याशी संपर्क केला. या कामात मदत करण्याचे आश्वासन देत मुरलीधर पाटील यांनी तक्रारदाराकडे २ लाख २० हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती.

तक्रारदारांनी धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांना संपर्क करून याबाबत तक्रार दिली.या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आणि मनजीतसिंग चव्हाण यांनी येथे सापळा लावला.

लाचेची रक्कम स्वीकारताना मुरलीधर पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का?

पाहा : ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा

https://www.youtube.com/watch?v=jI0xXSCQIr8

Exit mobile version