आता पुण्यातील उड्डाणपूल चुकणार नाहीत! | पुढारी

आता पुण्यातील उड्डाणपूल चुकणार नाहीत!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात चुकीच्या पद्धतीने उड्डाणपूल बांधण्याची परंपरा आता खंडित होणार आहे. उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्यापूर्वी संबंधित रस्त्यावर किती आणि कोणत्या प्रकारची वाहतूक आहे, कोणत्या दिशेला अधिक वाहने वळतात, यासंबंधीचे सविस्तर सर्वेक्षण अमेरिकेच्या लायडर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महापालिका करणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर खराडी बायपास चौकाची निवड करण्यात आली आहे.

खुशखबर! भारतीय रेल्वेत पुढील एका वर्षात १ लाख ४८ हजार लोकांची भरती होणार

महापालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक उड्डाणपूल तसेच नदीवरील पूल उभारण्यात आले आहेत. मात्र, यामधील अनेक पुलांची रचना चुकल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात अधिक भर पडल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चौक येथील दोन उड्डाणपूल पाडावे लागले, तर नव्याने कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील दुमजली पुलाची रचना चुकल्याचे आरोप होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील लायडर या तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी खेळाडू, पंचांच्या निवृत्तीवेतनात भरघोस वाढ

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे खराडी बायपास चौक येथे महापालिकेने उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासंबंधीचा आराखडा तयार केला. मात्र, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी आता महापालिकेकडून लायडर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथील वाहतुकीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी खराडी बायपास चौक, टाटा गार्डन आणि विमाननगर चौक येथे लायडरचे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

लायडर तंत्रज्ञान नक्की काय आहे..?
लायडर हे अमेरिकेतील प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यानुसार रस्त्यावर
कॅमेरे बसविले जातात. या कॅमेर्‍याच्या माध्यमातून 360 अंश कोणातून रस्त्यावरील वाहतुकीची माहिती गोळा केली जाते. त्यात संबंधित रस्त्यावर कोणत्या प्रकारची किती वाहने, कोणत्या वेळेत धावतात, कोणत्या दिशेला वाहने जातात, संबंधित वाहनांचा प्रकार, असा सगळा डेटा गोळा होऊन त्याचे अ‍ॅनालिसिस केले जाते. अगदी पावसात आणि धुक्यात हे काम होते. त्यानुसार सात दिवसांचा डेटा करून त्यावरील वाहतुकीचे विश्लेषण करून संबंधित ठिकाणी नवीन रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग करण्याचे नियोजन केले जाते. खराडी चौकातील प्रायोगिक कामासाठी 10 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

Back to top button