नाशिक : मानसिक रुग्णास दोरीने बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न, निफाडमधील धक्कादायक प्रकार

नाशिक : मानसिक रुग्णास दोरीने बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न, निफाडमधील धक्कादायक प्रकार

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाचे हातपाय दोरीने बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न गावकरी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने फसला. पीडित हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाइकांनी त्याला अनेक ठिकाणच्या देवस्थानी ठेवले. इतकेच नव्हे तर पायात लोखंडी बेडी घातली. त्यानंतर शिरवाडे (वाकद) येथील एका भगताकडे अघोरी पूजेची तयारी केली. मात्र, गावकरी व अंनिसच्या पुढाकाराने हा प्रयत्न फसला.

एका भगताच्या सांगण्यावरून मनोरुग्णाचे नातेवाईक त्याला गोदावरी नदीत आंघोळ घालून मंगळवारी 11 च्या सुमारास नातेवाईक व भगत मोर्विस नदीकाठी रहदारीपासून दूर अंतरावर एकांतात जमा झाले. मात्र, गावकर्‍यांना हे संशयास्पद वाटल्याने आणि काही चुकीचा प्रकार होत असल्याचे समोर आल्याने त्यांनी मोर्विसचे पोलिसपाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर चांदगुडे यांनी हा जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाइकांना सांगितले. पीडितास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पूजेपेक्षा डॉक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकर्‍यांनी पीडितास बांधलेल्या दोरातून मुक्त केले. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली व संबंधित भगतावर कारवाई होण्याची मागणी केली. गावकर्‍यांच्या जागरूकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबल्याने परिसरात नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते. त्यामुळे रुग्णास साखळदंड, बेडी अथवा दोरीने बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही. त्यास मानसोपचार तज्ज्ञाची गरज असते. अशा घटनांत 'अंनिस'कडून समुपदेशन केले जाते.
– कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news