घाऊक महागाई निर्देशांक 15.88 टक्क्यांवर | पुढारी

घाऊक महागाई निर्देशांक 15.88 टक्क्यांवर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सरत्या मे महिन्यातील किरकोळ महागाई निर्देशांकात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र केंद्र सरकारकडून मंगळवारी जारी करण्यात आलेले घाऊक महागाई निर्देशांकाचे (डब्ल्यूपीआय) आकडे मात्र चढेच आले आहेत. मे महिन्यात हा निर्देशांक 15.88 टक्के इतका नोंदविला गेला असून सलग चौदाव्या महिन्यात हा निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर राहिलेला आहे.

याआधी वर्ष 2012 मध्ये घाऊक महागाई निर्देशांक 16 टक्क्यांच्या समीप गेला होता. त्यानंतर पहिल्यांदाच हा निर्देशांक त्या स्तरावर गेला आहे. एप्रिल महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक 15.08 टक्के इतका नोंदविला गेला होता तर गतवर्षीच्या मे मध्ये हा निर्देशांक 13.11 टक्क्यांवर होता. व्यापार मंत्रालयाने महागाई मापनाच्या नव्या सीरिजची सुरुवात एप्रिल 2013 मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंतचा घाऊक महागाई निर्देशांकाचा हा सर्वात जास्त आकडा आहे.

मिनरल ऑईल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ, बेस मेटल्स, गैरखाद्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने यांच्या दरवाढीमुळे मे महिन्यात महागाई वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मे मध्ये खाद्यपदार्थांचे दर 8.08 टक्क्यांवरून वाढून 10.89 टक्क्यांवर गेले. दुसरीकडे भाजीपाल्याचे दरदेखील कडाडले आहेत. निर्मिती क्षेत्रातील वस्तूंच्या दरात मात्र काही प्रमाणात घट नोंदविली गेली आहे तर इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे.

Back to top button