म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठीच्या गृहनिर्माण विभागाने केले बदल | पुढारी

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठीच्या गृहनिर्माण विभागाने केले बदल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठीच्या विविध उत्पन्न गटांच्या उत्पन्न मर्यादेत गृहनिर्माण विभागाने बदल केले असून उच्च उत्पन्न गटासाठीची किमान व कमाल उत्पन्न मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. या उत्पन्न गटासाठी 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर महानगर क्षेत्र, तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्र अंतर्गत उत्पन्न गटाच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. या क्षेत्रातील अत्यल्प गटासाठी 6 लाखांपर्यंत, अल्पसाठी 9 लाखांपर्यंत, मध्यमसाठी12 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा ठरवण्यात आली आहे. उच्च उत्पन्न गटासाठी यापुढे किमान आणि कमाल उत्पन्न मर्यादा नसेल.

अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती चारही गटांसाठी, अल्प गटातील व्यक्ती अल्प, मध्यम व उच्च गटासाठी, मध्यम गटातील व्यक्ती मध्यम व उच्च गटासाठी, तर उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती फक्त त्याच गटासाठी अर्ज करू शकतात. बदल कशासाठी? केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने 2017 साली परवडणार्‍या घरांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा व घरांच्या क्षेत्रफळासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यात नमूद केलेले चटई क्षेत्रफळ हे राज्यात यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या चटई क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे.

मात्र यामध्ये उत्पन्न मर्यादा ही प्रस्तावित उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असली तरी 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांचे दरडोई उत्पन्नही देशाच्या दरडोई उत्पनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे संबंधित प्रवर्गासाठी निश्चित केलेली कमाल उत्पन्न मर्यादा व्यवहार्य ठरत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी सरकारी निर्णयात सुधारणा करण्यात आली. तथापि त्यात काही त्रुटी राहिल्या. त्या दूर करण्यासाठी सुधारित निर्णय घेण्यात आला आणि बदल करण्यात आले.

Back to top button