अँडरसनने गाठला 650 विकेटस्चा टप्पा | पुढारी

अँडरसनने गाठला 650 विकेटस्चा टप्पा

लंडन : वृत्तसंस्था :  इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. जेस्म अँडरसनने जो विक्रम केला आहे तो कसोटी क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात कुठल्याही अन्य वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही. जेस्म अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 650 बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो मुरलीधरन आणि शेन वॉर्ननंतर तिसर्‍या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला कसोटी सामना हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1877 मध्ये खेळवला गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही वेगवान गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान, 2003 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या जेम्स अँडरसनने 19 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर कसोटी क्रिकेटमधील 650 बळींचा टप्पा ओलांडला आहे.

39 वर्षीय जेम्स अँडरसनने न्यूझीलंडविरुद्ध नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यामध्ये दुसर्‍या डावात टॉम लॅथमला 4 धावांवर त्रिफळाचित करत कसोटी क्रिकेटमधील त्याच्या 650 बळींचा टप्पा पूर्ण केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये 650 बळींचा टप्पा ओलांडणारा अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळींचा विचार केल्यास सर्वाधिक 800 बळींचा विश्वविक्रम श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीधरननंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न दुसर्‍या स्थानी आहे. त्याने 709 बळी मिळवले होते. तर 650 बळींसह अँडरसन तिसर्‍या स्थानी आहे. भारताचा अव्वल फिरकीपटू अनिल कुंबळे 619 बळींसह सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

Back to top button