नाशिक : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

नाशिक : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे हजारो वारकऱ्यांसह त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मागच्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे वारीस जाता न आल्याने हिरमुसलेल्या वारकऱ्यांनी यावर्षी मात्र अलोट गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.

ञ्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी घेऊन हजारो वारकरी विठुरायाचे नाव घेत आषाढवारी करिता पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाले. तेव्हा ढगाळलेल्या अवकाशातून सुर्यनारायणास देखील हा विलोभनिय सोहळा पाहण्याचा मोह आवरला नाही. सकाळी १० वाजेच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिरात आरती झाली आणि चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ झाली. जवळपास पंचवीस ते तीस हजारांच्या दरम्यान वारकरी यामध्ये वृध्द महिला पुरूषांच्या सोबतीनेच नव्याने सहभागी झालेले भाविक देखील मोठया संख्येने आहेत.

सकाळी संत निवृत्तीनाथ मंदिरात प्रमुख दिंडी चालकांना आणि आलेल्या पाहुण्यांना नारळ प्रसाद देण्याचा कार्यक्रम झाला. प्रशासक सहायक धर्मदाय सहआयुक्त राम लीप्ते, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, मुख्याधिकारी संजय जाधव, पुजारी गोसावी बंधु यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळेस माजी विश्वस्त पुंडलिकराव थेटे, ह.भ.प.जयंतमहाराज गोसावी, रामभाऊ मुळाणे, त्याचप्रमाणे डॉ. महामंडलेश्वर लहवीतकर महाराज, गोसावी बंधु, माजी संस्थान अध्यक्ष मुरलीधर पाटील आदिंसह मोठया संख्येने भाविक उपस्थीत होते.

फुलांनी शृंगारलेल्या रथामध्ये संत निवृत्तीनाथांच्या पादुका असलेली पालखी ठेवण्यात आली होती. मंगलमय वाद्य आणि हरीनामाचा गजर तशात पालखी पुढे नाच करणारे अश्व होते. येथील नंदकुमार मोरे यांचे मंगल वाद्य लक्ष वेधून घेत होते. नाथांची पालखी चांदीच्या रथातून प्रस्थान करती झाली. अग्रभागी नगरा असलेली बैलगाडी सज्ज करण्यात आली आहे. पालखी प्रस्थानास सातपुरपर्यंत माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली. प्रस्थानाच्या वेळेस काही अंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी बैलांचे कासरे हाती धरले आणि रथ पुढे नेला.

संत निवृत्तीनाथ मंदिर चौक रांगोळयांनी सजवला होता. दिंडीत सहभागी होण्यासाठी मागील दोनचार दिवसांपासून वारकरी शहरात येत होते. पांडुरंग कोरडे आणि जयंत महाराज गोसावी यांच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मित्रमंडळाच्या वतीने रविवारी सायंकाळी येथे उपस्थित वारकरी भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. तिर्थराज कुशावर्तावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली. तेव्हा उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार-सोनवणे, आरोग्य यात्रा सभापती सागर उजे, अशोक घागरे, समीर पाटणकर, कैलास चोथे यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

सत्यनारायण मंदिर मेनरोड येथे महामृत्युंजय प्रतिष्ठान व त्र्यंबकेश्वरचा राजा गणेश मंडळ यांच्या वतीने नगरसेविका शितल कुणाल उगले यांनी स्वागत केले.  कुणाल उगले यांनी सपत्नीक आरती केली. येथे पालखीवर पुष्पवृष्ठी करण्यात आली. पालखी सोबत यावर्षी मोठया प्रमाणात वारकरी भाविक सहभागी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मागर्दशनाखाली उपाधीक्षक कविता फडतरे, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफळ, यासह मेघराज जाधव, सचिन गवळी, साळवी आदींसह सहकारी यांनी आपल्या कर्मचार्यांसह सर्व मार्गावर वाहने थांबणार नाही याची दक्षता घेत अत्यंत सुंदर नियोजन केले. ञ्यंबक पोलीसांनी हॉटेल संस्कृती पर्यंत पायी चालत जाऊन निरोप दिला.

अभिनव ग्रुपचे संस्थापक रतीशबापु दशपुत्रे हे पहिल्यांदाच वारीस निघाले आहेत. त्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी अशी अापली काही वर्षांपासून इच्छा होती. मागची दोन वर्ष कोव्हिडच्या संकटाने जाता आले नाही. यावर्षी निर्बंध हटले आहेत मात्र पुढील कालावधीत पुन्हा संधी मिळते की नाही म्हणून यावर्षी आपण वारीस जाण्याचा निर्णय घेतला असे सांगितले.

दिंडोरी येथील बापुराव जाधव¸ को-हाटे येथील वसंराव को-हाटे, शिवाजी कदम, सुरेश कदम, आडगावचे बाळासाहेब हळदे हा वयोवृध्द वारक-यांचा ग्रुप मागच्या काही वर्षांपासून दरवर्षी दिंडी सोबत जात असायचा मात्र सलग दोन वर्ष कोव्हिडने त्यांच्या वारीस खंड पडला. यावर्षी दुप्पट उत्साहाने ते पालखी सोबत निघाले आहेत.

ञ्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्ष सिंहस्थ 2003 मध्ये त्यांनी ञ्यंबकेश्वरचे नेतृत्व केले. त्या पुष्पा झोले, आहुर्लीच्या शारदा गायकर आणि अन्य काही महिला वीस वर्षांपासून पंढरपुरला पालखी सोबत पायी जातात. मागची दोन वर्ष त्यांची वारी घडली नाही. याबाबत त्यांना आयुष्यातून काही तरी निसटले अशी भावना होती. मात्र यावर्षी निर्बंध हटले तशी त्यांनी वारीची तयारी सुरू केली होती. आता त्या उत्साहाने पालखी सोबत निघाल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button