बुलडोझर कारवाईवर ओवैसी भडकले; म्‍हणाले ‘मुख्यमंत्री योगी मुख्य ….’ | पुढारी

बुलडोझर कारवाईवर ओवैसी भडकले; म्‍हणाले 'मुख्यमंत्री योगी मुख्य ....'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  ‘एआयएमआयएम’चे असुदुद्दीन ओवैसी यांनी बुलडोझर कारवाईवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्यावर टीकास्‍त्र सोडले. गुजरातच्या कच्छमध्ये सभेत त्‍यांनी मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्यावर जोरदार हल्‍लाबाेल केला. मुख्यमंत्रीच आरोपी कोण ठरवणार असतील तर न्यायालयाची काय गरज? असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला.

भाजपच्या माजी नेत्‍या नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावरुन उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे हिंसाचार झाला. या प्रकरणातील मास्‍टर माइंड जावेद पंप याच्या घरावर रविवारी प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. यावरून असुदुद्दीन ओवैसी यांनी उत्‍तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्यावर टीका केली आहे. .गुजरातमधील सभेदरम्‍यान ओवैसी म्‍हणाले, “आरोपी कोण आहेत हे मुख्यमंत्री ठरवणार असतील, तर न्यायालयाची काय गरज आहे? योगी आदित्‍यनाथ यांनी घरावर नाही तर, कायद्यावरच बुलडोजर चालवला आहे, अशी  टीकाही त्‍यांनी केली.

उत्‍तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेत मुख्य न्यायाधीश… 

ओवैसी म्‍हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बनलेत. ते ठरवतील त्‍याचे घर तोडले जाईल. तुम्‍ही एका समुदायाच्या घरावर बुलडोझर चालवून देशाचे संविधान कमकुवत करत आहात.”

प्रयागराज हिंसाचाराचा मास्‍टर माईंड जावेदचे घर जमीनदोस्‍त… 

प्रयागराज शहरात हिंसाचार पसरवल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद जावेद उर्फ ​​जावेद पंपचे घर प्रशासनाने रविवारी पाडले. प्रशासनाच्या कारवाईत जावेदच्या आलिशान घर उद्ध्वस्‍त करण्‍यात आले . यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच फौजफाटा जमण्यास सुरुवात झाली होती.जावेदच्या घरातून अनेक काडतुसे आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. एक 12 बोअर पिस्तूल आणि इतर काही शस्त्रे जप्त करण्यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचलंत का?  

Back to top button