वाघोली, पुढारी वृत्तसेवा: वाघोली (ता. हवेली) येथे पुणे-नगर महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार करण्यात आले. परंतु, देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण यामुळे येथे पदपथ नावालाच उरल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वाघोली गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. साहजिकच वाघोलीसह परिसरात लोकसंख्येबरोबरच उद्योग धंदे, कंपन्या, विविध छोटे-मोठे व्यवसाय, शाळा, महाविद्यालये, कंपन्या आदींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नगर महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.
ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच पदपथ तयार करण्यात आले. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पदपथाची अतिशय दुरावस्था झाली आहे. महामार्गालगत असणार्या व्यावसायिकांनी पदपथावर ताबा केल्यामुळे शाळकरी मुलांसह जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने पदपथावर अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा