नाशिक : दुचाकीची उभ्या आयशरला मागून धडक; एक ठार, दोघी गंभीर जखमी | पुढारी

नाशिक : दुचाकीची उभ्या आयशरला मागून धडक; एक ठार, दोघी गंभीर जखमी

नाशिक (सिन्नर/ नांदूर शिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात दुचाकी आयशर टेम्पोवर मागच्या बाजूने धडकल्याने झालेल्या अपघातात चास येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली आहे. अन्य दोघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि.28) दुपारी 4.15 च्या सुमारास हा अपघात घडला.

साक्षी अनिल खैरनार (20, रा. चास, ता. सिन्नर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून सविता सूर्यभान सांगळे (20 रा. सोनेवाडी, ता. सिन्नर), वर्षा सुभाष जगताप (20, रा. कासारवाडी, ता. सिन्नर) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चास, कासारवाडी व सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या साक्षी खैरनार, सविता सांगळे व वर्षा जगताप तिघी विद्यार्थिनींनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी संगमनेर येथे सीईटीच्या क्लासला त्या तिघी जात होत्या. क्लास आटोपल्यानंतर दुचाकी ऍक्टिव्हाने (क्र.एमएच-15, एचएल-1419) घराकडे परतत असताना नांदूरशिंगोटे शिवारात खंडोबा टेकडी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर (क्र.एचआर.61 डी-9843) या विद्यार्थिनींची भरधाव दुचाकी धडकली. त्यात साक्षी खैरनार ही गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी सविता सांगळे व वर्षा जगताप या दोघींना संगमनेर येथे उपचारांसाठी नेले आहे. साक्षी खैरनार हिच्या अपघाती मृत्यूने चास खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक अपघाताची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button