बेळगाव : तवंदी घाट ठरतोय मृत्यूची वाट..! | पुढारी

बेळगाव : तवंदी घाट ठरतोय मृत्यूची वाट..!

निपाणी : मधुकर पाटील
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीपासून जवळ असलेल्या तवंदी घाटात 2004 पासून शेकडो अपघात होऊन अनेकांचे गेले आहेत. वर्षाला या घाटात किमान 100 अपघात होतात. पण अजूनही उपाययोजनेकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तवंदी घाटातील प्रवास भीतीच्या सावटाखालीच सुरु असून तवंदी घाट अन् मरणाची वाट असे समीकरण तयार झाले आहे. एकदा शुक्रवारी झालेल्या कार व कंटेनर अपघातात चौघांना प्राण गमवावे लागले आहेत.

अन्य राज्यातून येणारे पर्यटक आंबोली, गोवा आदी ठिकाणी तवंदी घाटमार्गेच जातात. राष्ट्रीय महामार्गामुळे औद्योगिक विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. सध्या या घाटात महिन्याला किमान 10 ते 15 अपघात होतात. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होण्यापूर्वी या घाटात लूटमारीच्या घटना अधिक होत होत्या. मात्र, आता त्या थांबल्या असल्या तरी वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे मात्र वाहनधारकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून डिसेंबर 2003 ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला.

सन 2004 पूर्वी तवंदी घाटातून एकेरी वाहतूकच सुरू होती. रस्ता अरुंद असल्याने सर्वच अवजड वाहने कमी वेगाने ये-जा करत. त्यानंतर चौपदरी रस्ता झाल्याने अवजड वाहनधारकांसह सर्वच वाहने सुसाट धावू लागली आहेत. तवंदी घाटातील एस आकाराचे वळण मृत्यूची दाढ बनत चालले आहे. बेळगावकडून निपाणीत प्रवेश करण्यापूर्वी या घाटातील सहा वळणे पार करावी लागतात.

पहिल्या वळणावर शिप्पूर फाटा, सत्यवती पॅलेसला जाण्यासाठी रस्ता आहे. शेजारीच दरी असल्याने वाहने जपून चालवावी लागतात. रस्त्याची उतरती बाजू आणि लागूनच दरी असल्याने रस्ता व वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. शिवाय स्तवनिधी मंदिराकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड मुख्य महामार्गाला जोडला आहे. हेच वळण अलीकडच्या काळात धोकादायक ठरत आहे.

2009 मध्ये शिप्पूर फाटा वळणावर बंगळूरहून पुण्याकडे निघालेल्या इन्फोसीसच्या विद्यार्थ्यांच्या आराम बसला अपघात होऊन 13 विद्यार्थ्यांची बळी गेला होता 2019 साली स्तवनिधी मंदिराकडे जाणार्‍या धोकादायक वळणावर ट्रक चालकाच्या चुकीने मुरगूड (ता. कागल) येथील जमादार यांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले.शिवाय गॅस गळतीचा उलटलेला टँकर अशा अनेक घटना ताज्या आहेत.
तवंदी घाटात वाहने चढताना सावकाश जात असल्याने अपघाताची शक्यता नसते. पण, येतेवेळी उताराला अवजड वाहनांवरील वेगावर नियंत्रण करणे कठीण होते. शिवाय या काळात वळण घेणेही मुश्कील होत असल्याने अपघात घडत आहेत. विशेष करून पहाटेच्यावेळी चालकाला झोप लागल्याने अनेक अपघात झाले आहेत.

 चर्चा झाली मात्र कार्यवाही नाही

2019 मध्ये या ठिकाणी झालेल्या अपघातात मुरगूड येथील जमादार कुटुंबीयाचा बळी गेला होता. या घटनेनंतर प्रशासनाने जिल्हा पातळीवर बैठक बोलावून या घाटात होणारे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचारविनिमय केला होता. यावेळी तवंदी घाट पोखरून रस्ता करता येईल का, यावर चर्चा झाली होती.परंतु त्यानंतर आजतागायत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

डिझेल बचतीचा अट्टाहास जीवावर

येथे ट्रक व कंटेनरचे अपघात सर्वाधिक होत आहेत. अनेक वाहन चालक डिझेल बचतीसाठी वाहने बंद करून सोडतात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. तसेच घाटातील दुभाजकांची उंची कमी आहे. घाट चढणार्‍या वाहनांच्या हेडलाईटचे प्रकाशझोत घाट उतरणार्‍या वाहनचालकांच्या डोळ्यावर पडताच हे दुभाजक दिसत नाहीत. घाटामधील दुभाजकांमध्ये झाडे लावण्याची आवश्यकता आहे. बाजूपट्ट्या व अपघाती जागा म्हणून निश्चित केलेल्या किलर स्पॉटच्या ठिकाणी रस्ते बांधकाम कंपनीने वेगवेगळ्या उपयायोजना करूनही वाहनधारकांनी खबरदारी घेतलेली नाही.

होनगा ते कोगनोळी या 77 किमी अंतरात महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी अनेक ठिकाणी लहान-मोठे सुमारे 50 भुयारी मार्ग आहेत. मात्र वेळ व फेरी वाचविण्यासाठी याचा वापर होताना दिसत नाही. अनेक वाहनधारक कोणत्याही ठिकाणावरून वाहने मुख्य रस्त्यावर आणत आहेत. यामुळेच अशी ठिकाणीच दुचाकी व इतर वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. मध्यंतरी तवंदी घाट काढण्याबाबत विचार झाला. परंतु कणगला व इतर गावे उठवावी लागत असल्यामुळे हा विषय मागे पडला असून आता या मार्गाचे सहापदरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या पुढील काळात या घाटात कमी वेगात वाहने धावण्यासाठीच उपाययोजना करावी लागेल.

बेफिकीरपणाने व झोपेत वाहने चालविल्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत. वेगावर मर्यादा न ठेवल्याने वाहने दरीत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाट परिसरात सर्वच वाहनधारकांनी कमी वेगाने वाहने चालविणे हितावह ठरणार आहे.

 – संगमेश शिवयोगी, सीपीआय, निपाणी

– तवंदी घाटातील 5 वर्षांतील अपघात –

वर्ष                              अपघात संख्या          मृत्यू
जून 2015 ते मे 2016             58                   20
जून 2016 ते मे 2017             63                   25
जून 2017 ते मे 2018             48                   12
जून 2018 ते मे 2019            112                  30
जून 2019 ते मे 2020             20                   05
मे 2021 ते 28 मे 2022          22                   28

Back to top button