Nigeria Stampede : नायजेरियातील चर्चमधील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू | पुढारी

Nigeria Stampede : नायजेरियातील चर्चमधील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nigeria Stampede : दक्षिण नायजेरियात चर्चमधील एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पोर्ट हार्कोर्ट शहरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी अन्न वाटप सुरू असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश मुले आहेत. कार्यक्रमाला गेट बंद असतानाही जमावाने कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या गेटवर अन्न वाटप सुरू असताना मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत काही लोकांना जमिनीवर ढकलण्यात आले त्यानंतर गदारोळ माजला, आणि झालेल्या चेंगराचेंगरीत काही लोकांचा चिरडून मृत्यू झाला. रिवर राज्याचे पोलिस प्रवक्ते ग्रेस इरिंज-कोको यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी अन्न वाटपावेळी आलेल्या शेकडो लोकांनी चर्चचे गेट तोडले, त्यानंतर तेथे चेंगराचेंगरी झाली. (Nigeria Stampede)

अचानक झालेल्या या चेंगराचेंगरीमुळे वातावरण बिघडले आणि लोक जमिनीवर पडून चिरडून मृत्यूमुखी पडले. ही चेंगराचेंगरी झाली तेव्हा कार्यक्रमाला सुरुवातही झाली नव्हती. 31 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. जखमींना जवळच्या पोर्ट हार्कोर्ट रुग्णालयात नेण्यात आले. (Nigeria Stampede)

नायजेरियाच्या सिव्हिल डिफेन्स कॉर्प्सचे प्रादेशिक प्रवक्ते ओलुफेमी अयोडेल यांच्या म्हणण्यानुसार, ‘ही घटना एका स्थानिक पोलो क्लबमध्ये घडली, जिथे जवळच्या किंग्स असेंबली चर्चने ‘भेटवस्तू देणगी मोहिमे’चे आयोजन केले होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटना घडली.’

Back to top button