जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी गटाच्या मंत्र्यांकडे जाणे कमीपणाचे वाटत नाही : सुप्रिया सुळे | पुढारी

जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी गटाच्या मंत्र्यांकडे जाणे कमीपणाचे वाटत नाही : सुप्रिया सुळे

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; राजकारणात निवडणुकीदरम्यान टोकाचे वैचारिक मतभेद असले तरीही जनतेच्या विकासासंबधीत कामांसाठी विरोधी गटाच्या मंत्र्यांकडे जाणे कमीपणाचे वाटत नाही. असे सांगतानाच दिल्लीच्या राजकारणात फार कमी लोक संवेदनशील आहेत. त्यापैकी संवेदनशील असणाऱ्या मंत्र्याकडून खान्देशाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

धुळे एस.एस.पी.पी.एस महाविद्यालयाच्या सभागृहात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकरी आणि आदिवासी यांच्या समस्या ऐकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी खानदेशातील वेदनांवर भाष्य केले. या कार्यक्रमाची सुरुवात नागराची पूजा करुन करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी मांडलेल्या व्यथा या मनाला वेदना देणार्‍या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी सांगतात की, दिलदारपणाने टीका करा, मात्र सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल केला पाहिजे. त्यांच्या या वाक्याची आठवण झाल्याचे त्या म्हणाल्या.

खानदेशात योजना आहे. त्यासाठी निधी देखील दिला जातो आहे. मात्र त्यातील गॅप भरून काढावा लागेल. राज्याच्या परिवर्तना मध्ये खानदेशाचे मोठे योगदान आहे. खान्देश भूमी मधून कविता लिहिणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांनी कवितेच्या माध्यमातून परिवर्तनाचा वारसा निर्माण केला आहे. खान्देशात सामाजिक काम करीत असताना कामाची मोठी ऊर्जा मिळते. बारामतीमध्ये देशपातळीवरील कृषी विज्ञान केंद्र आहे. या ठिकाणी खानदेशातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या राजकारणात फार कमी लोक संवेदनशील आहे. त्यापैकी संवेदनशील असणाऱ्या मंत्र्यांकडे जाऊन या खान्देशातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शिरपूर येथील साखर कारखाना हा मल्टीस्टेट असून त्याची सूत्रे केंद्राकडे असल्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क करून याविषयी आपण बोलणार आहे. राजकारणात टोकाचे मतभेद वैचारिक असले तरी विरोधी मंत्र्यांकडे जनतेच्या विकासासाठी जाणे आपल्याला कमीपणाचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

नेत्यावर जनतेचा विश्वास असतो. या विश्वासाला तडा लागला तर अवघड स्थिती निर्माण होते. लोक विसरत नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास हा टिकला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे या आक्रमक असून कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देणे हे त्यांचे काम आहे. पण, महाराष्ट्रात आघाडी सरकार आहे, तोपर्यंत त्यांना लढा देण्याची वेळ येणार नाही. आघाडी सरकारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे लढा देण्याची वेळ आपण येऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण सेंटर धुळ्यात करणार असून यासाठी एक चांगली टीम उभी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात बापू हटकर, माजी आमदार शरद पाटील, प्रकाश बाविस्कर, डॉ. विजया महाजन यांच्यासह अनेकांनी विविध विषयांवर खानदेशात अपूर्ण असलेल्या प्रकल्प आणि शिक्षण तसेच आरोग्य विषयक समस्या मांडल्या. या समस्या राज्यातील संबंधित मंत्र्यांच्या दालनात बैठक लावून तातडीने सोडवल्या जाणार असल्याची माहिती देखील खासदार सुळे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button