दिल्लीतील अतिक्रमणविरोधी मोहिमेला मुख्यमंत्री केजरीवाल यांचा विरोध | पुढारी

दिल्लीतील अतिक्रमणविरोधी मोहिमेला मुख्यमंत्री केजरीवाल यांचा विरोध

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांनी विरोध केला आहे. बुलडोझर ऍक्शनला आमचा विरोध राहील, यासाठी आम आदमी पक्षाच्या आमदारांना तुरुंगात जावे लागले तरी हरकत नाही, असे केजरीवाल यांनी सोमवारी ‘आप’ आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) ६३ लाख लोकांची घरे तोडण्याची योजना आखत असल्याचा आरोप केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला. ज्या पध्दतीने एमसीडी काम करीत आहे, ते पाहता ८० टक्के दिल्ली अतिक्रमणाच्या टप्प्यात येईल, असे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, गेल्या ७५ वर्षात बनलेली दिल्ली नियोजनाशिवायची दिल्ली आहे. अशा स्थितीत ८० टक्के भाग अतिक्रमणाखाली येऊ शकतो. मग ८० टक्के बांधकामे तोडले जाणार काय? अतिक्रमणविरोधी मोहिमेला विरोध करताना तुरुंगात जावे लागले तरी घाबरू नका, असे आपण आमदारांना सांगितले आहे.

ज्या पद्धतीने अतिक्रमण हटविले जात आहे, त्याला माझा विरोध असल्याचे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, लोकांना नोटीस न देता कारवाई सुरु आहे. अनेक लोकांना तर सामान हटविण्यासाठी वेळ मिळालेला नाही. लोक ओरडून सांगत आहेत की माझ्याकडे कागदे आहेत पण त्यांच्या बांधकामावर थेट बुलडोझर चालविला जात आहे. दिल्लीतील सर्व कच्च्या कॉलनी तोडण्याचा भाजपचा डाव आहे. अशा कॉलन्यांत ५० टक्के लोक राहत आहेत. दुसरीकडे झोपड्या हटविण्याचा कटही शिजत आहे. झोपड्यात १० लाख लोक राहतात. ३ लाख मालमत्ता अशा आहेत, की ज्या ठिकाणी बाल्कनी थोडी बाहेर आलेली आहे, अशा प्रकारे ६३ लाख बांधकामांवर बुलडोझर चालविण्याचा योजना आहे. याला दिल्ली सरकारकडून जोरदार विरोध केला जाईल.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button