जळगाव : पत्रावळी उचलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून - पुढारी

जळगाव : पत्रावळी उचलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील तरुणाचा कंदुरीच्या कार्यक्रमात पत्रावळी उचलण्याच्या कारणावरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. पारध पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाकडी येथील जगन भाऊराव सिरसाठ यांचा शुक्रवारी सारोळा पीर (ता. सिल्लोड) येथे कंदुरीचा कार्यक्रम होता. त्या निमित्त वाकडी येथील त्यांच्याच भावकितील सुनील दादाराव सिरसाठ (वय ३०) हा सकाळी ११ वाजता कार्यक्रमासाठी सारोळा पीर येथे गेला. या कांदुरीच्या पंगतीत संशयीत आरोपी सोमनाथ विनायक सिरसाठ (वय ३६, रा.वाकडी) याचा आणि सुनीलचा पंगतीतील पत्रावळी उचलण्याच्या कारणावरून वाद झाला.

या वादाचा राग सोमनाथ याने मनात धरला. सुनील जेवण करून घरी वाकडी येथे जात होता. यावेळी जानेफळ गायकवाड ते वाकडी रस्त्यावर सोमनाथने सुनीलची मोटारसायकल आडवून त्याला खाली खेचले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याचे गुप्तांग पिळले. ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सुनीलला सिल्लोड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच सुनीलचा मृत्यू झाला. अशा आशयाची फिर्याद मयत सुनील याचा भाऊ अंबादास सिरसाठ यांनी शनिवारी पारध पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयीत आरोपी सोमनाथ सिरसाठ याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो. नि.अभिजीत मोरे हे करीत आहेत.

Back to top button