नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात ऊसशेती बनली बिबट्यांचे माहेरघर | पुढारी

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात ऊसशेती बनली बिबट्यांचे माहेरघर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असून, बिबट्याने उसाच्या शेतामध्ये आश्रय घेतल्याने उसाचे शेत बिबट्यांचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे उसाच्या शेतात काम करणे व पाणी देणे मोठे कठीण झाले आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील कादवा नदी परिसरासह ओझे, करंजवण, म्हेळुस्के या भागात बिबट्याने दहशत निर्माण केल्यामुळे शेतकरीवर्गात मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडे तक्रार केलेल्या गावामध्ये पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, उसाच्या शेतात बिबटे आपल्या छोट्या पिल्लांसह वास्तव्य करीत आहेत.

त्याचप्रमाणे हा परिसर कादवा नदीचा असल्यामुळे बिबट्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. हे बिबटे दिवस-रात्र कादवा नदी परिसरात भटकंती करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसासुद्धा उसाला पाणी देण्याची शेतकर्‍यांची हिंमत होत नाही. कादवा नदी परिसरातील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, लखमापूर, कादवा, म्हाळुंगी गावाचा परिसर हा बिबट्याचे सध्या माहेरघर होत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी ओझे येथील शेतकरी शिवाजी हरी शिंदे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button