कोल्हापूर : बाप रे… ५५ दिवसांत ६५ जणांची आत्महत्या! | पुढारी

कोल्हापूर : बाप रे... ५५ दिवसांत ६५ जणांची आत्महत्या!

कोल्हापूर : दिलीप भिसे
शहर, जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याने सार्वत्रिक चिंतेचे वातावरण आहे. 1 मार्च ते 24 एप्रिल या 55 दिवसांच्या काळात 65 जणांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्रकार घडला आहे. दीडशेहून अधिक जणांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याचे धक्‍कादायक चित्र आहे. चिंतेची बाब म्हणजे, 15 ते 25 वयोगटात 45 टक्के, 25 ते 40 गटात 30 टक्क्यांवर प्रमाण असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक विवंचना, शिवाय क्षुल्‍लक कारणातूनही स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न होत असल्याने चिंतेचे सावट आहे. आत्महत्येसाठी 70 टक्के गळफास, 20 टक्के विषारी द्रव प्राशन, 10 टक्के अन्य पर्यायांचा अवलंब केला जात आहे. असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. शासकीय रुग्णालयात तर विषारी द्रव प्राशन केलेल्यांची संख्या वाढत आहे. रोज सरासरी 10 ते 12 असे प्रमाण आहे.

मनाला चटका लावणार्‍या घटना

गत महिन्यात मार्च 2022 मध्ये जिल्ह्यात 38 जणांनी मृत्यूला कवटाळले. दि. 1 ते 24 एप्रिलमध्ये 27 जणांनी जगाचा निरोप घेतला. श्रेयश (वय 21), प्रथमेश (20), शाळकरी मुलगा आयर्न (15), ज्युनेद (21), विश्‍वजित (17) या कोवळ्या मुलांनीही जगाची ओळख होण्यापूर्वीच स्वत:चा शेवट करून घेतला. त्यात 17 ते 22 वयोगटातील 5 युवतींचाही समावेश आहे. आठवड्यापूर्वी एका महिला कॉन्स्टेबलनेही कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलले.

कोवळ्या पोरांच्यागळ्यातही फाशीचा दोर!

मार्च एडिंगमुळे वसुलीच्या तगाद्याने सावकारी त्रासाला कंटाळून चौघांनी मृत्यूला कवटाळे आहे. शैलेश (38), संतोष (47), प्रवीण (30) यांचा यात समावेश आहे. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या एका युवतीने, दहावीचा पेपर अवघड गेल्याने 17 वर्षीय मुलानेही आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला.

विश्‍वासघातकी प्रेमकहाणी

एका रूपवान कॉलेज तरुणीची वर्गातील सहकारी तरुणाशी ओळख आणि त्यानंतर मैत्रीत रूपांतर झाले. कालांतराने त्यांच्यात प्रेम बहरले. एकमेकाला साथ देण्यासाठी आणाभाका झाल्या. वर्षानंतर प्रेमकहाणी दोघांच्या घरांपर्यंत पोहोचली. तरुणीच्या पालकांनी संमती दिली; मात्र तरुणाच्या घराकडील मंडळींनी विरोध केला. तरुणीसह पालकांनी विनवणी केली. दुर्दैवाने तरुणानेही लग्‍नाला नकार दिला. तरुणीवर जणू आकाश कोसळले. तिने कीटकनाशक प्राशन केले. आठवड्याभर मृत्यूशी झुंज दिली. नवव्या दिवशी तिचा मृत्यू झाला. विश्‍वासघातकी ठरलेल्या या तरुणाने एका सामान्य घराण्यातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्या आयुष्याचा खेळ केला. मनाला चटका लावणार्‍या घटनेने करवीर, राधानगरी तालुक्यांत हळहळ व्यक्‍त करण्यात येत होती.

महापुराने घेतला व्यावसायिकाचा बळी!

जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात मोठी हानी झाली. शेतकर्‍यांसह उद्योग, व्यावसायिकांनाही मोठी झळ सोसावी लागली. तालुक्यातील एका कृषी सेवा दुकान व्यावसायिकाचेही प्रचंड नुकसान झाले. अखेर नैराश्येतून या तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Back to top button