रत्नागिरी : कारागृहात ई-कोर्ट संकल्पना राबवणार | पुढारी

रत्नागिरी : कारागृहात ई-कोर्ट संकल्पना राबवणार

रत्नागिरी : जान्हवी पाटील
तारखांना वारंवार कोर्टात जावू लागू नये, अत्यावश्यक वेळी थेट कारागृहातूनच न्यायाधीशांशी संवाद साधता यावा, या हेतूने कारागृह प्रशासनाकडून ई-कोर्ट संकल्पना राबविण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र खोली तयार करण्यात येणार आहे. ही खोली न्यायालयाच्या प्रतिमेसारखी तयार केली जाणार आहे. या ठिकाणी आल्यावर बंदिवानाला आपण कोर्टातच आहोत याची जाणीव होईल, अशा पद्धतीने हे ई- कोर्ट असणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाकडून देण्यात
आली.

मुळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंदिवान न्यायालयाशी संवाद साधणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही ई कोर्ट तयार केली जाणार आहे. यामुळे पोलिस आणि न्यायालय यांच्या वेळेचीही बचत होणार आहे. ज्या केसेसबाबत ई कोर्टव्दारे संवाद साधणे शक्य आहे अशा केसेस या ठिकाणी सुनावणीसाठी घेतल्या जातील तर ज्या केसेसमध्ये प्रत्यक्षात न्यायालयात न्यावे लागणार आहे, अशा वेळी न्यायालयात नेले जाणार आहे.

नव्या ई-न्यालयालयाच्या संकल्पनेमुळे बंदिवानांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न मार्गी लागणार आहे. बंदिवानांना कोर्टात नेण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागत होते. ई कोर्ट संकल्पनेची अंमलबजावणी पुढील अल्पावधीतच सुरु होणार असल्याची माहिती प्राप्‍त झाली आहे. त्यामुळे नेमके ई कोर्ट कसे असेल, या बाबत आता कारागृह कर्मचार्‍यांना उत्सुकता लागून राहिली
आहे.

Back to top button