सिंधुदुर्ग : दोडामार्गातील शासकीय विश्रामगृह असून नसल्यासारखे! | पुढारी

सिंधुदुर्ग : दोडामार्गातील शासकीय विश्रामगृह असून नसल्यासारखे!

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
दोडामार्ग तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी शासकीय विश्रामगृह असूनही ते जणू नसलेल्या स्थितीत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या विश्रामगृहाचा वापर शासकीय कार्यालय म्हणून सध्या होत आहे. वास्तविक पाहता तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयींनीयुक्‍त शासकीय विश्रामगृह असणे गरज आहे. परंतु, याकडे कधीही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने हा प्रश्‍न अनुत्तरितच राहिला आहे. त्यामुळे येथील विश्रामगृहाचा प्रश्‍न स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाने मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर येथे सर्व शासकीय कार्यालये स्थापन झाली. परिणामी अधिकारी, कर्मचारी वर्ग वाढला. तालुका झाला, आता इतर सोयीसुविधा देखील येथे नक्‍कीच निर्माण होतील, अशी आशा तालुकावासीयांमध्ये निर्माण झाली. जसजसा काळ लोटत होता तसतसा तालुक्याचा हळूहळू विकास होऊ लागला. आमदार, खासदार, मंत्री यांचे दौरै दोडामार्गात वाढू लागले. मात्र या तालुक्याची खरी समस्या आहे, ती म्हणजे शासकीय विश्रामगृहाची. येथे शासकिय विश्रामगृहच नसल्याने बाहेर गावाहून येणारे मंत्री अधिकारी, पदाधिकारी व मंडळींनी रहायचे तर नेमके कोठे? असा प्रश्‍नच निर्माण झाला आहे.

दोडामार्ग मुख्यालयाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकिय विश्रामगृह बांधले. मात्र या विभागाच्या कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार नेमका कोठून चालवायचा़? हा पेच निर्माण झाला. अखेर नाईलाजास्तव या बांधकाम विभागाचा विश्रामगृहातून कारभार चालू झाला व विश्रामगृहाची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. दोडामार्ग तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला असल्याने तो जैव विविधतेने नटलेला आहे. या अनुषंगाने अनेक संशोधक तालुक्यात येऊन संशोधन करीत असतात. मात्र त्यांना येथे राहण्यास विश्रामगृह नसल्याने त्यांची गैरसोय होते. दोडामार्गात मोकळे शासकिय भूखंड मोठ्या प्रमाणावर आहेत. यापैकी एखाद्यावर भूखंडावर विश्रामगृह उभारले गेल्यास याचा फायदा नक्‍कीच येथे येणार्‍यांना होऊ शकतो. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी देखील येथील विश्रामगृहाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

वनविभागाची दोन विश्रामगृहे

दोडामार्ग व साटेली-भेडशीत वनविभागाचे विश्रामगृह आहे. कोरोना काळात दोडामार्ग आयटीआय मध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आला. दरम्यान या दोन वर्षांच्या कालावधीत येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आयटीआयचा सर्व कारभार चालायचा. या काळात या विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हे विश्रामगृह सुस्थितीत नव्हते. सध्या या इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम सुरु आहे. तर साटेली-भेडशी येथील विश्रामगृह सुस्थितीत असून विश्रामगृह तालुक्याच्या ठिकाणापासून 12 कि.मी. अंतरावर आहे. याचा उपयोग तिलारी येथे आलेल्यांना नक्कीच होतो. मात्र तालुका मुख्यालयात आलेला अनेकांना याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे दोडामार्ग मुख्यालयात सर्व सोयींनी युक्त असे सुसज्ज विश्रामगृह उभारण्याची गरजआहे.

Back to top button